Baramati Assembly constituency : लोकसभेनंतर आता बारातमीच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि युगेंद्र पवार यांच्यात ही लढत होणार असल्याने पवार कुटुंबीयांची प्रतिष्ठा पुन्हा एकदा लागली आहे. या लढतीकडे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी विशेष लक्ष दिले आहे. बारामतीचा गड राखण्यासाठी शरद पवारबारामतीमध्ये सभांचा धडाका लावला आहे. सुपा येथे एका सभेत बोलताना शरद पवार यांनी राज्यातून परराज्यात गेलेल्या उद्योगांवरुन पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. एका राज्याचं काम करायचं असेल तर पंतप्रधान कशाला होता? असा सवाल शरद पवार यांनी केला आहे.
बारातमी विधानसभेची निवडणूक शरद पवार आणि अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. गेली ३५ वर्षे बारामतीचे नेतृत्व करणाऱ्या अजित पवार यांच्यासमोर त्यांचे सख्खे पुतणे, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांचे आव्हान आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यामुळेच शरद पवार यांनीही बारामतीकडे विशेष लक्ष दिले आहे. सुपा येथे जाहीर सभेत बोलताना शरद पवार यांनी महायुती सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. गुजरातचं कल्याण करा. पण महाराष्ट्राचं नुकसान करू नका, असं शरद पवारांनी म्हटलं.
"पंतप्रधानांनी देशाचा आणि मुख्यमंत्र्यांनी राज्याचा विचार करायचा असतो. पंतप्रधान आणि त्यांच्या सहकाऱ्यांच टाटांशी काय बोलणं काय माहीत नाही. काय जादू झाली माहीत नाही. नागपूरमध्ये विमान बनवण्याचा कारखाना होणार होता. तो गुजरातला नेला. इथे हाताला काम नाही. मोबाईलची चीप बनवणारी कंपनी फॉक्सकॉनचा कारखाना महाराष्ट्रात करायचा होता. वेदांतावाल्यांना पंतप्रधान मोदींनी बोलावून घेतलं. काय जादू केली माहीत नाही. तो महाराष्ट्रातील कारखाना गुजरातला नेला. मी गुजरातच्या विरोधात नाही. गुजरातचं कल्याण करा पण महाराष्ट्राचंही कल्याण करा. महाराष्ट्राचं नुकसान करू नका,” असं शरद पवार म्हणाले.
"तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. पण तुम्ही फक्त एका राज्याचं काम करत असाल तर पंतप्रधान कशाला होता? जाऊन तिथे मुख्यमंत्री व्हा. माझी काही तक्रार नाही. पण हे जे काही घडतंय ते राज्याच्या हिताचं नाही. देशाच्या हिताचं नाही. अनेक राज्यात हाताला काम नाही. इथल्या राज्यकर्त्यांनी इथल्या राज्यातील लोकांच्या हितासाठी जी धमक दाखवायची, ती दाखवत नाहीत. त्याचा परिणाम म्हणजे आमचं काम दुसरीकडे चाललं आहे. ते थांबवायचं असेल तर इथली सत्ता बदलली पाहिजे. सत्ता बदलण्याशिवाय गत्यंतर नाही,” असंही शरद पवार म्हणाले.