Baramati EVM Strong room CCTV controversy: लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून बारामती मतदारसंघाची चर्चा रंगली होती. पवार कुटुंबाचा गड मानल्या जाणाऱ्या बारामतीमध्ये शरद पवार ( Sharad Pawar ) गटाकडून सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) आणि अजित पवार ( Ajit Pawar ) गटाकडून सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) यांच्यात लढत झाली. ७ मे रोजी झालेल्या मतदान प्रक्रियेनंतरही राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरुच असल्याचे दिसले. मविआच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी एक व्हिडिओ शेअर करत दावा केला की, बारामतीतील ईव्हीएम मशिन्स ज्या स्ट्राँगरुममध्ये ठेवण्यात आले होते तेथील सीसीटीव्ही कॅमेरे ४५ मिनिटे बंद होते. सुळे यांच्या या आरोपावर निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी स्पष्टीकरण दिले असून ते पुण्याच्या जिल्हा माहिती कार्यालयाने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून प्रसिद्ध केले.
स्पष्टीकरण दिलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की-
"सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित नसल्याच्या तक्रारीबाबत असे स्पष्ट केले जात आहे की भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व प्रोटोकॉलचे पालन केल जात आहे. त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था, सर्व ईव्हीएम योग्यरित्या सीलबंद आणि त्यांची सील अबाधित आहेत. रिटर्निंग ऑफिसर स्ट्राँग रूमला नियमित भेट देतात. याशिवाय कार्यालयीन आदेशानुसार ARO आणि AARO ने भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार स्ट्राँग रूमला भेट दिली आहे. ईव्हीएम ठेवण्यामध्ये निष्काळजीपणा असल्याचा आरोप नाकारण्यात येत आहे.
सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित होती. केवळ डिस्प्ले युनिटवरील चित्र दिसू शकत नव्हते हे याद्वारे कळवण्यात येत आहे. सीसीटीव्हीचा डेटा अबाधित आहे आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोणताही व्यत्यय आलेला नाही. प्रोटोकॉलनुसार बॅकअपबाबत सर्व सूचना एजन्सीला देण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेज पाहून याची पडताळणी करण्यात आली आहे. स्ट्राँग रूम पाहण्याची सुविधा ही एक अतिरिक्त सुविधा आहे. सर्व सुरक्षा वैशिष्ट्ये प्रोटोकॉलचे पालन केले जाते आणि त्यात तडजोड केली जात नाही. डिस्प्ले कार्यान्वित असताना आणि मशिन्स उतरवताना तक्रारदाराचे दोन प्रतिनिधी देखील उपस्थित होते. सीसीटीव्ही शाबूत असल्याने आणि योग्य प्रोटोकॉल पाळले जात असल्याने घाबरण्याचे कारण नाही, असे स्पष्टीकरण कविता द्विवेदी यांच्या नावाने पोस्ट केलेल्या संदेशात देण्यात आले आहे."
- कविता द्विवेदी, IAS, निवडणूक निर्णय अधिकारी.