बारामती : विधानसभेची पहिली निवडणूक बारामतीतून १९६७ साली लढविली. त्यावेळी काँग्रेसमधून ११ जण इच्छुक होते. त्यापैकी दहा जणांनी मला तिकीट न देता कोणालाही द्यावे, असा ठराव केला. मुंबईत यशवंतराव चव्हाण यांच्याकडेदेखील दहा जणांनी हाच प्रस्ताव मांडला. परंतु चव्हाण यांनी, ‘एक जागा गेली तरी चालेल’, असे सांगून मला तिकीट दिले. ती निवडणूक मी जिंकली. त्यावेळेपासून आजपर्यंत बारामतीकरांनी विजयाची परंपरा कायम ठेवत मला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले, असे भावपूर्ण उद्गार राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष, माजी कृषीमंत्री खा. शरद पवार यांनी काढले. बारामती तालुका शहर नागरी गौरव समारंभ समितीच्या वतीने शरद पवार यांचा गुरुवारी गौरव करण्यात आला. केंद्र सरकारने पवार यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविले आहे. यानिमित्त हे आयोजन करण्यात आले होते. बारामतीत घरच्या लोकांकडून होत असणाऱ्या या सोहळ्यासाठी प्रतिभाताई पवार, खा. सुप्रिया सुळे, अजित पवार, विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर, आमदार हेमंत टकले आदी मान्यवर उपस्थित होते.प्रचाराला न येता बारामतीकरांनी प्रत्येक निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून दिले. ज्या हेतूने त्यांनी ताकद दिली, तो हेतू साध्य करण्यासाठी, देशहितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करू, अशा शब्दात पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली. बारामतीकरांनी राजकारणात मला ५० वर्षे स्थिरता दिली. आजवर दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी ते विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माझ्याविरोधात सभा झाल्या. परंतु बारामतीकरांनी करायचे ते केले. हे भाग्याचे स्थान बारामतीकरांनी दिले. आज मी जो काही आहे, तो बारामतीकरांमुळे. त्यामुळेच शेवटच्या श्वासापर्यंत मी बारामती आणि देशाच्या विकासासाठी झटत राहील, असेही पवार यांनी सांगितले. (वार्ताहर)भाग्याचे स्थान दिले...मी अतिशयोक्ती करीत नाही. देशात केवळ एक ते दोन जण अजिबात प्रचाराला येत नाहीत. बारामतीत १४ निवडणुका केल्या. शेवटची निवडणूकही फलटणमधून चांगल्या मताने निवडून दिली. हे भाग्याचे स्थान बारामतीकरांनी दिले.- शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री.
बारामतीकरांमुळेच यशाच्या शिखरावर!
By admin | Published: April 15, 2017 1:48 AM