पुणे - Sunetra Pawar Speech ( Marathi News ) गेल्या एक महिन्यापासून मी मतदारांना भेटतेय, त्या मतदारांच्या ज्या मागण्या आहेत, त्या मी ऐकत होते, मला या मतदारसंघाची जबाबदारी देऊन महायुतीने जो विश्वास दाखवला, तो मी माझ्या कामातून जनतेच्या साथीने नक्कीच सार्थ करून दाखवेन असं आवाहन सुनेत्रा पवार यांनी बारामती मतदारसंघातील जनतेला केले आहे.
वारजे येथे महायुतीच्या मेळाव्यात सुनेत्रा पवार म्हणाल्या की, अजितदादांना आपण सगळेच ओळखता, त्यांच्या कामाचा धडाका, आवाका आणि कामाची पद्धत, त्यांनी दिलेला शब्द या सगळ्यांवर आपल्या सर्वांचा विश्वास आहे. त्यामुळे जनता अजितदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आपल्या विकासासाठी नक्की काय करायला हवं, भविष्यासाठी आणि तळागाळातील लोकांच्या हितासाठी काय गरजेचे होते हे दादांनी ओळखलं, त्यातून त्यांनी मोदींसोबत जाण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकार अतिशय उत्तम प्रकारे काम करताना आपण पाहतोय. गेल्या १० वर्षात मोदींनी भारताचं नाव ज्या उंचीवर पोहचवलं आहे. त्यांचे धाडसी निर्णय, अफाट काम त्यामुळे जनतेचा मोदींवरील आत्मविश्वास वाढलेला आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच जनता मोदींच्या मागे एकवटून उभी राहिली असून आपणही भविष्यासाठी, सक्षम भारतासाठी सर्वांनी एकत्र यायचं आहे. महायुतीने जी मला बारामतीची उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून मी निवडणुकीच्या रिंगणात आहे. घड्याळाच्या चिन्हासमोरील बटण दाबून जास्तीत जास्त मतदान करावे ही आपल्या सर्वांना माझी विनंती आहे असंही सुनेत्रा पवारांनी जनतेला आवाहन केले.
दरम्यान, मतदारसंघात मी प्रचाराला फिरत होते, त्यावेळी माझ्या माता भगिनी, युवक, वृद्ध माणसे, सगळे लोक मला उत्साहाने मला भेटत होते. त्यांच्या मनात आणि डोळ्यात एकप्रकारची आस होती. ही आस मला आत्मविश्वास आणि लढण्याचं बळ देत होते. आगामी काळात मी त्यांच्यासाठी काही तरी करावं. आपल्या ज्या काही अडीअडचणी आहेत. माझ्या युवकांच्या हाताला काम, महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना रोजगार, माझा शेतकरी राजा कसा सुखी होईल यासाठी जे जे काही करण्याची धमक आणि माझा संपूर्ण मतदारसंघ कसा समृद्ध होईल हे माझे ध्येय असणार आहे. त्यामुळे ७ तारखेला जास्तीत जास्त मतदान करून मला संधी द्यावी असंही सुनेत्रा पवारांनी जनतेला सांगितले.