बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 07:40 AM2024-05-07T07:40:17+5:302024-05-07T07:41:56+5:30
Baramati loksabha Election - बारामती मतदारसंघातील मतदानाच्या आदल्या रात्री सत्ताधाऱ्यांकडून पैसे वाटल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी करत अजित पवारांवर निशाणा साधला.
पुणे - Rohit Pawar on Ajit Pawar ( Marathi News ) लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी ७ पासून सुरुवात झाली आहे. या टप्प्यात बारामती मतदारसंघाचा समावेश असून याठिकाणी पवार कुटुंबाने सकाळी लवकर मतदान करून लोकशाहीतील आपला हक्क बजावला. परंतु त्याचवेळी मतदानासाठी आलेल्या आमदार रोहित पवारांनीअजित पवारांवर गंभीर आरोप केले. बारामतीत पोलिसांच्या बंदोबस्तात पैशाचा पाऊस पाडला जात आहे असं सांगत रोहित पवारांनी ट्विटवर काही व्हिडिओ शेअर केले.
आमदार रोहित पवार म्हणाले की, बारामतीत काही ठिकाणी २५०० रुपये, ३००० रुपये, ४ हजार रुपये प्रति मत अशाप्रकारे पैसा वाटला गेला. पीडीसीसी बँक गरीबाला ५ वाजता बंद होते. परंतु पैसे वाटण्यासाठी रात्री १-२ पर्यंत सुरू राहते. पीडीसीसी बँक, कर्मचारी आणि झेड सिक्युरिटीचा वापर केला गेला. पोलिसांच्या गाडीचा पैशासाठी वापर झाला पण अनेक ठिकाणी लोकांनी पैसे नाकारले. ही लढाई जनशक्तीविरुद्ध धनशक्ती झालीय. जनशक्ती ही शरद पवार, सुप्रिया सुळेंच्या बाजूने तर धनशक्ती ही अजित पवारांच्या बाजूने असल्याचा टोला त्यांनी लगावला.
तसेच बारामती मतदारसंघात जनशक्तीचा विजय होईल. २०१४ पर्यंत सत्ता ही शरद पवारांमुळे आली. सत्तेमुळे अजित पवारांना मंत्रिपद मिळाले मग त्यांनी विकास केला. २०१९ ला अजित पवारांचा काही पराक्रम नसतानाही सत्ता शरद पवारांनी आणली. पद अजितदादाला मिळाले, निधी दिला. त्यामुळे तुम्ही स्वत:च्या हिंमतीवर काय केले हे अजित पवारांना सांगता येत नाही त्यामुळे ते लोकांना कसं पटणार. शरद पवार साहेबांच्या विचाराला तुम्ही सोडलं. त्यामुळे लोक तुमच्यासोबत नाहीत असा घणाघातही रोहित पवारांनी अजित पवारांवर केला.
दरम्यान, समोर जो आरोप करतोय त्याच्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे त्याच्या आरोपाला काही महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही. त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याची मला गरज वाटत नाही. ही निवडणूक भावकी-गावकीची नाही. देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. त्यादृष्टीने लोकांनी विचार करून मतदान करावं असं सांगत अजित पवारांनी रोहित पवारांचे आरोप फेटाळले.