सचिन कापसे बारामती : मागील ४० वर्षांपासून एकसंधपणे बारामतीचा गड राखणारे पवार कुटुंब पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहे. शरद पवार की अजित पवार अशा द्विधा मनस्थितीत बारामतीकर मतदार अडकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे विभागलेली ताकत घेऊन अस्तित्वाची लढाई म्हणून आता लढली जात आहे.
महायुतीची शक्ती सुनेत्रा पवारांच्या मागे तर महाआघाडीची शक्ती सुप्रिया सुळेंच्या मागे उभी असली, तरी बारामतीकर कुठल्या पवारांच्या मागे जातात, यावर विजयाचे गणित अवलंबून आहे. १९८४ साली शरद पवार पहिल्यांदा बारामतीतून निवडून गेले. त्यानंतर १९९१ साली अजित पवारांना खासदारकीची संधी मिळाली. पण त्यानंतर लगेच घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. मात्र त्यानंतर शरद पवारांनी २००९ पर्यंत या मतदारसंघाचे नेतृत्व केले. त्यानंतर २००९ पासून आजपर्यंत सुप्रिया सुळे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
रणनीती शरद पवारांची शरद पवारांनी इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादीपासून दुरावलेले पृथ्वीराज जाचक, आप्पासाहेब जगदाळे तसेच बारामतीत काकडे, तावरे यांच्याशी जवळीक साधत बेरीज करण्याचा प्रयत्न केला आहे. तर इंदापूरमध्ये सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सक्रिय असणाऱ्या प्रवीण माने यांना फोडण्यात फडणवीस यशस्वी झाले.
अजित पवारांचे आव्हान सुप्रिया सुळे २००९ पासून या मतदारसंघाचे नेतृत्व करत आल्या आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. सुनेत्रा पवारही काही दिवसांपासून मतदारसंघ पिंजून काढत आहेत. २०१९ पर्यंत अजित पवार सुप्रिया सुळे यांच्यासोबत होते. या वेळी अजित पवारांचेच कडवे आव्हान आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
बारामती तालुक्यात जिरायती भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई असल्याचा मुद्दा महत्त्वाचा. एकेकाळी भोर परिसरामध्ये मोठ उद्योगधंदे होते. नंतरच्या काळात कारखाने बंद पडल्याने या परिसरामध्ये रोजगाराच्या संधी कमी झाल्या. मतदारसंघातील अनेक भागांत रस्त्यांची दुरवस्था. अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची समस्या.
...तर गटातटाचा फटकाविजय शिवतारे यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. अजित पवारांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. मात्र एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करत अजित पवारांशी त्यांचे संबंध ठीक करून दिले. हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यातही फार सख्य नसल्यामुळे प्रत्यक्ष बूथवर काय होईल, याबाबत साशंकता आहे.
एकूण मतदार २३,६२,४०७
१२,३६,५०७ -पुरुष
११,२५,७८४- महिला