बारामती - Sharad Pawar in Baramati ( Marathi News ) यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातील पवारविरुद्ध पवार लढत रंगतदार बनली आहे. महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे तर महायुतीकडून सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरूवात झाली आहे. त्यात बारामतीतील कन्हेरीचा मारुती प्रसिद्ध देवस्थान असून त्याठिकाणी शरद पवारांनी दर्शन घेत सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे.
बारामतीतील प्रचाराबाबत युगेंद्र पवार म्हणाले की, कन्हेरी मारुतीच्या मंदिरात आल्यावर सगळ्यांनाच आशीर्वाद मिळतो. कौल कुणाला मिळणार हे बारामतीतील जनताच ठरवणार आहे. काकी उभ्या राहतील असं वाटत नव्हतं, परंतु माझा अंदाज खोटा ठरला. दादांच्या निवडणुकीला आम्हीही फिरायचो, माझे वडील स्वत: सायकलवरून फिरलेत. जुने फोटोही आहेत. अजितदादा काहीही बोलू शकतात. मी त्यांच्यावर बोलण्याइतका मोठा नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच मागील ४-५ वर्षापासून मी बारामतीत फिरतोय, यंदा तुतारीचं वातावरण आहे. सुप्रिया सुळे मोठ्या फरकाने निवडून येतील. चांगले मताधिक्य मिळेल. बारामती मतदारसंघ हा खूप मोठा आहे. बारामती, इंदापूरपासून हिंजवडीपर्यंत आहे. त्यामुळे किती लाखांचे मताधिक्य मिळेल याचा अंदाज देता येणार नाही. पण लीड चांगली मिळेल असा माझा विश्वास असल्याचं युगेंद्र पवार यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पुरोगामी विचार, सत्य आणि असत्य हे परमेश्वराला नक्की कळतं, त्यामुळे न्याय शरद पवारांच्या बाजूने लागेल. महाराष्ट्र त्यांच्यासोबत आहे. बारामतीतील निकाल सकारात्मक लागेल. मी प्रत्येक निवडणुकीत प्रचाराला उतरले आहे. तेव्हा घरोघरी प्रचार केलाय, २५ वर्ष अजितदादांसाठी राबलोय त्यामुळे आम्ही प्रचार केला नाही हे खरे नाही. आज जुनेजाणते लोक शरद पवारांसोबत आहेत. काहीही अपेक्षा नसताना ही माणसं साहेबांसोबत आहेत. आमची लढाई भाजपासोबत आहेत. समोर कोण उमेदवार आहेत त्यावर भाष्य केले नाही. हुकुमशाहीविरोधात लढाई आम्ही लढतोय असं रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांनी म्हटलं.