Vijay Shivtare (Marathi News) : बारामतील लोकसभा मतदार संघाची देशभरात चर्चा सुरू आहे. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशीच लढत होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. दोन्ही गटाकडून जोरदार प्रचारही सुरूये. खासदार सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी बारामती येथील पवार कुटुंबातील सर्वच सदस्य मैदानात उतरल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे महायुतीमधील शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्याविरोधात बंड करण्याची तयारी सुरू केली आहे. विजय शिवतारे यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर टीकेचा बाण सोडलाय.
हेही वाचा - अजित पवारांचं कारे, शिंदेंना झटका देणार शिवतारे; राजीनामा देण्याची तयारी
शिवतारे यांनी बोलताना कारवाईसंदर्भातील वृत्तांवरही भाष्य केलं. "माझ्यावर कारवाई होणार अशी चर्चा होती. बातम्या होत्या. काय होतं ते पाहू. मी लोकसभेला उभा राहणार आणि विजयीदेखील होणार. शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवावी आणि जिंकावी. मी महायुतीत विनंतीही केलीये. मुख्यमंत्र्यांनी जागा सोडवून घेतल्यास मला आनंद होईल," असंही ते म्हणाले. टीव्ही ९ मराठीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.
"गरजतात ते बरसत नाही असं ते म्हणाले ना मग का एवढं सगळं बोलतायत. आम्ही इकडे माणसं उभी करतोय, तिकडे उभी करतो असं ब्लॅकमेलिंग का करतायत, खिलाडू वृत्तीनं लढा. मी १०० टक्के जिंकेन, नाहीतर अजित पवारांचा तरी खात्मा होईल," असं त्यांनी म्हटलं.
"वेळ पडली तर शिवसेनेचा राजीनामा देऊ"
"मी सध्या तांत्रिक बोलत आहे. मी आरेला कारे करत नाही, या धरणाच्या कामाच्या प्रश्नावर उत्तर द्या. लोकांची अजित पवार यांना मतदान करण्याची इच्छा नाही. महायुतीचा धर्म जरुर पाळला पाहिजे, महायुतीमध्ये जर एखाद्या उमेदवाराला एवढा विरोध होत असेल तर आम्ही ठरवू. वेळ पडली तर शिवसेनेचा राजीनामा देऊ. आमचे सर्व कार्यकर्ते सध्या या मानसिकतेत आहेत, असा इशारा विजय शिवतारे यांनी यापूर्वी दिला होता.