- शगुफ्ता शेख
बारामती - Sunetra Pawar on Sharad Pawar Statement ( Marathi News ) लोकसभा निवडणुकीनिमित्त राज्यात प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. त्यात बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा शरद पवार विरुद्ध अजित पवार असा थेट सामना आहे. शरद पवारांकडून लेक सुप्रिया सुळे तर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यात शरद पवारांनी मूळ पवार आणि बाहेरचे पवार हे विधान केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. पवारांच्या या विधानावर प्रश्न विचारताच सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अश्रू आले.
नुकतेच बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचारावेळी अजित पवारांनी जिथं पवार आडनाव दिसेल तिथं बटण दाबायचं असं आवाहन जनतेला केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना शरद पवारांनी मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे असं विधान केले. मात्र त्यांच्या विधानावर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही यावर भाष्य करत म्हटलं की, "शरद पवार यांचं एक विधान आलं, 'मूळ पवार आणि बाहेरुन आलेला पवार' म्हणजे यातून त्यांना काय म्हणायचं आहे. जर एखादी सून ३०-४० वर्ष लग्न होऊन घरी आलेली असली तरी ती घरची होत नाही, ती बाहेरची राहते. हे त्यांचं बोलन मला अजिबात पटलेलं नाही. एका व्हिडिओत त्यात त्यांना एकच मुलगी आहे. यावरुन प्रश्न केला होता, यावर त्यांनी आपले विचार पाहिजे, मुलीला मुलासारखी ट्रिटमेंट देऊन तिला ताकदवान बनवलं पाहिजे, हे त्यांचे विचार ऐकून मला बरं वाटलं होतं, किती प्रगतशील विचार आहेत. पण, बाहेरील पवार असं कुठेतरी हे विधान आले, ते मला पसंत नाही, आता ज्या सूना आहेत त्यांना हे विधान आवडणार नाही असं त्यांनी म्हटलं होते.
शरद पवारांच्या या विधानावरून पत्रकारांनी सुनेत्रा पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी काहीही उत्तर न देता तिथून निघून गेल्या. मात्र या प्रश्नानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याचं दिसून आले.
अजित पवार काय म्हणाले होते?
बारामतीत पत्नी सुनेत्रा पवार यांचा प्रचार करताना अजित पवार म्हणाले होते की, "तुम्ही पहिल्यापासून पवारांच्या मागे उभे राहिलात, त्यामुळे जिथं पवार आडनाव असेल तिथे मतदान करायचं. त्यामुळे आपली परंपरा खंडित केली अशी भावना कुणाच्या मनात येणार नाही असं म्हणत अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शरद पवारांनी सुप्रिया सुळे याच मूळ पवार असून सुनेत्रा पवार तर बाहेरून आल्या असल्याचं अप्रत्यक्षरित्या सांगितलं.