Ajit Pawar on Rohit Pawar : बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत होत आहे. आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी सभा घेत एकमेकांवर टीकेचे बाण सोडले. आमदार रोहित पवार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची खिल्ली उडवली. मी सांगितल्याप्रमाणे शेवटच्या सभेत भावनिक करण्याचा प्रयत्न केला गेला. आमच्या एका पठ्ठ्याने तर डोळ्यातून पाणी काढले. मी पण करून दाखवतो मला मतदान द्या. असली नौटंकी बारामतीकर अजिबात खपवून घेणार नाहीत. रडणे म्हणजे हा झाला रडीचा डाव. हे असले इथे चालत नाही. त्यांना आम्ही जिल्हा परिषदेचे तिकीट दिले आहे. गळ्याची आण घेऊन सांगतो की, साहेबांनी द्यायला सांगितली नाहीत पण तरीदेखील मी दिली, अशी टीका अजित पवार यांनी रोहित पवारांवर केली. ते बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या सभेत बोलत होते.
रोहित पवार यांना रडू कोसळल्याचा दाखला देत अजित पवारांनी त्यांची नक्कल केली. "आमच्या एका पठ्ठ्याने डोळ्यातून पाणी काढून दाखवले मग मी पण दाखवतो... द्या मत. अरे काय, ही असली नौटंकी बारामतीकर खपवून घेणार नाहीत. तुम्ही काम दाखवा... हा रडीचा डाव असून असे चालत नाही", असे अजित पवार यांनी म्हटले.
अजित पवार रोहित पवारांवर बोलताना आणखी म्हणाले की, त्याने हडपसरला उभं राहायची इच्छा व्यक्त केली. पण आम्ही त्याला कर्जत जामखेडला जायला सांगितले. आम्ही त्यांना राजकारणाचे बाळकडू पाजले आहे आणि ते आता आमच्यावर टीका करत आहेत. त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त उन्हाळे-पावसाळे बघितले आहेत. खरे तर सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर झाले. जोपर्यंत नवीन पिढी तयार होत नाही तोवर डोळे मिटणार नसल्याचे शरद पवार साहेबांनी सांगितले असल्याचे रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार काय म्हणाले? राष्ट्रवादीच्या फुटीनंतरचा किस्सा सांगताना रोहित पवार भावनिक झाले. ते म्हणाले की, राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर टीव्हीवर बऱ्याच बातम्या सुरू होत्या. तेव्हा शरद पवार साहेबांप्रमाणे आम्ही देखील सर्वकाही पाहत होतो. पण पवार साहेबांच्या भावना सर्वकाही सांगत होत्या. मात्र, परिस्थिती तशी असताना देखील त्यांनी काळजी करू नका असे आम्हाला सांगितले होते. रोहित पवारांनी शरद पवारांनी सांगितलेले शब्द उच्चारताना त्यांना अश्रू अनावर झाले. "जोपर्यंत लढण्यासाठी नवी पिढी तयार होत नाही तोवर मी डोळे मिटणार नाही", असे पवार साहेबांनी सांगितले असल्याचा खुलासा रोहित पवारांनी केला. त्यांनी हे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच सन्नाटा पसरला. सर्वजण स्तब्ध झाले... हा प्रसंग सांगताना रोहित पवार ढसाढसा रडू लागले. मग पुन्हा हे शब्द वापरू नका आम्ही लढण्यासाठी सज्ज आहोत, अशी ग्वाही रोहित पवार यांनी शरद पवारांना दिली.