संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या आणि सर्वाधिक हाय व्होल्टेज असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये, तसेच विदर्भातील अमरावती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या हृदयाचे ठोके वाढवणारे वृत्त आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये सकाळी १०.१५ वाजेपर्यंत (निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार) आलेल्या निकालात महायुतीचे दोन्ही उमेदवार पिछाडीवर असल्याचे दिसत होते. बारामती मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या १००६३ मतांसह ३४३ मतांनी आघाडीवर आहेत. तर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना ९७२० मते मिळाली होती.
याशिवाय, याच वेळी अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha Result 2024) मतदारसंघातून नवनीत राणा पिछाडीवर आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे हे आघाडीवर आहेत. वानखडे (Balwant Wankhede) हे सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास ५२४६ मते घेत ३५३९ मतांनी आघाडीवर आहेत. तर नवनीत राणा (Navneet Rana) यांना १७०७ एढी मते मिळाली होती. 8
बारामती मतदारसंघात अजित पवार यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. पत्नी सुनेत्रा पवारच रिंगणात असल्याने अजित पवारांनी अगदी सोसायटीपर्यंत जाऊन प्रचार केला होता. मात्र आतापर्यंतच्या निकालात बारामतीकर अजित पवारांऐवजी पुन्हा एकदा शरद पवारांवर विश्वास ठेवताना दिसत आहेत.
अमरावतीत नवनीत राणा भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे दर्यापूर विधानसभेचे विद्यमान आमदार बळवंत वानखडे मैदानात उतरले आहेत. याशिवाय, आमदार बच्चू कडू यांनी प्रहारकडून दिनेश बुब (Dinesh Bub) यांना मैदानात उतरवले होते. यामुळे येथील लढत तिरंगी झाली होती.