"जनसेवेचा माझा प्रवास इथेच..."; पराभवानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 09:31 PM2024-06-04T21:31:55+5:302024-06-04T21:35:21+5:30

बारामती लोकसभा मतदारसंघातील पराभवानंतर सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Baramati Lok Sabha Result 2024 Sunetra Pawar first reaction after defeat | "जनसेवेचा माझा प्रवास इथेच..."; पराभवानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया

"जनसेवेचा माझा प्रवास इथेच..."; पराभवानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया

Baramati Lok Sabha Election Result :बारामतीमधल्या लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं होतं. नणंद विरुद्ध भावजय अशा सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची लढत पवार कुटुंबियांसाठी महत्त्वाची होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवत चौथ्यांदा खासदारकी मिळवली आहे. बारामतीमधल्या या निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पराभव स्विकारावा लागला आहे. बारामतीमधल्या पराभवानंतर सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार कुटुंबियांसाठी महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंचा विजय झाला. तर अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. सुरुवातीच्या फेरीपासूनच मताधिक्य घेतलेल्या सुप्रिया सुळे यांनी मोठ्या फरकाने ही निवडणूक जिंकली. सुरुवातीपासूनच ही निवडणूक अटीतटीची मानली जात होती. मात्र मतमोजणी सुरु होताच चित्र स्पष्ट होत गेलं आणि सुप्रिया सुळे मोठ्या फरकाने निवडून आल्या आहेत. यानंतर आता सुनेत्रा पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

"लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये जनतेने दिलेला कौल मी नम्रपणे स्विकारते. हाती आलेले निकाल अनपेक्षित असले तरी या निकालातून आम्ही आत्मपरीक्षण करु. नव्याने पुर्नबांधणी करु. ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास दर्शवून मला मतदान केले, त्या सर्वांचे मी आभार मानते. तसेच सर्व कार्यकर्ते व जनता यांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद देते. मात्र जनसेवेचा माझा प्रवास इथेच संपत नाही. मी जनसेवेस सदैव तत्पर आहे आणि असेन," असे सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे.
 

Web Title: Baramati Lok Sabha Result 2024 Sunetra Pawar first reaction after defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.