Baramati Loksabha Election : सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशा नणंद भावजयीमध्ये बारामती लोकसभा मतदारासंघात होत असलेल्या लढतीकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. पवार कुटुंबियांमध्ये होत असलेल्या या लढतीसाठी प्रचार, बैठका, सभा यांना बारामतीमध्ये वेग आला आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सुप्रिया सुळेंना वारंवार लक्ष्य केलं जात आहे. मी केलेल्या कामाचं श्रेय सुप्रिया सुळे घेत असल्याचे म्हणत पुन्हा एकदा अजित पवारांनी बहिणीवर टीका केली आहे.
मी केलेली कामे सुप्रिया सुळेंनी स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली असा आरोप अजित पवार यांनी केला. आंबेगावमध्ये भोर, वेल्हे आणि मुळशी येथील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी आंबेगाव परिसरात एमआयडीसी आणण्याचं आश्वासन देखील अजित पवारांनी दिलं.
काय म्हणाले अजित पवार?
"मला काही जण दाखवत होते की, दादा तुम्हीच केलेली काम आताच्या खासदारांनी पुस्तिकेत छापली. माझीच कामे अर्धी त्यामध्ये दाखवली. बारामतीमधल्या सगळ्या इमारती मी बांधल्या पण फोटो मात्र दाखवून मी केलं मी केलं असं सांगितलं. मित्रांनो ते केलं आहे तर भोरमध्ये काय केलं ते सांगा? भोर, वेल्ह्यात काहीच केलं नाही आणि नुस्ती भाषणं. मी सकाळी सात वाजल्यापासून रात्रीपर्यंत भाषणं करीन पण त्यामुळे याचं पोट भरणार आहे का? काहीतरी कृती करण्यासाठी प्रशासानावर तुमची पकड असायला हवी, अशी खोचक टीका अजित पवारांनी केली.
सुनेत्रा पवार काही लाखांनी जिंकणार - अजित पवार
" मी ज्या ज्या वेळी निवडणुकांमध्ये उतरतो, माझा आत्मविश्वास असतो म्हणूनच मी निवडणुकांमध्ये उतरतो. मी निवडणुकांमध्ये हरण्यासाठी कधीच उतरत नाही, जिंकण्यासाठीच उतरत असतो आणि या निवडणुकीतही मी काही लाखांनी जिंकणारच आहे," असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला आहे.