Baramati Loksabha: अजित पवार म्हणाले, 'बायकोचं काम करावंच लागणार'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'बहिणीचं प्रेम...'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 01:51 PM2024-04-26T13:51:07+5:302024-04-26T13:53:43+5:30
Supriya Sule : बारामतीमध्ये प्रचारादरम्यान अजित पवारांनी केलेल्या टीकेला सुप्रिया सुळेंनी भावनिक प्रत्युत्तर दिलं आहे.
Baramati Loksabha Election : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. बारामतीमधला प्रचार देखील अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे नणंद भावजयच्या या लढतीत एकमेकांवर जोरदार टीका केल्या जात आहेत. अशातच खडकवासला इथं प्रचारादरम्यान, विरोधी पक्षाच्या खासदाराचे काही चाललेच नाही असं विधान अजित पवारांनी केलं होतं. त्यावर आता सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिलीय.
इथल्या खासदारांचे काही चाललं नाही म्हणत अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंना लक्ष केलं होतं. त्यावर आता प्रचारादरम्यानच माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना भावनिक उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले अजित पवार?
संरक्षण मंत्री ज्या विचारांचा आहे त्याच विचाराचा खासदार संसदेत गेला पाहिजे. मागच्या वेळी विरोधी पक्षाचा खासदार इथून निवडून देण्यात आला. त्याचं तिथं काही चाललंच नाही. आता ते खासदार आम्हाला सोडून गेले आहेत. तुम्ही माझ्या बायकोला निवडून दिलं तर मी तुमचा पालकमंत्री आहे. पुणे पालिका, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए, राज्य सरकारचा निधी आहे आणि मग माझी पण जबाबदारी वाढणार आहे. उद्या बायको घरी म्हणाली, "ए हे काम करून दे तर सकाळी मला करून द्यावेच लागणार आहे. नाहीतर माझं काही खरं नाही," असं अजित पवार यांनी म्हटलं.
या सगळ्यावर सुप्रिया सुळेंनी त्याच भागात प्रचार करत असताना प्रतिक्रिया दिली. "ठीक आहे, कदाचित बहिणीचं प्रेम कमी पडलं असेल. दुर्दैवाची गोष्ट आहे की सगळेच नात्यांमध्ये अडकले आहेत. मी सर्वात आधी देश, मग राज्य, मग पक्ष आणि मग नाती पाहते. मी नात्यांसाठी राजकारणात आलेली नाही. मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आली आहे," अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं.
दुसरीकडे, बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची सभा होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याबाबतही सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं."अतिथी देवो भवः आपल्या मतदारसंघात सगळ्यांचे स्वागत होणार आहे. प्रत्येकाचे स्वागत तुतारी वाजवणारा माणूसच करेल," अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली.