'तुम्ही मनापासून त्यांना देव मानतच नव्हता'; दानवेंचा अजितदादांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 12:11 PM2024-05-01T12:11:12+5:302024-05-01T12:18:18+5:30
Maharashtra Politics : एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो पण आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
Ambadas danve on Ajit Pawar : बारामती लोकसभा निवडणुकीवरुन पवार कुटुंबियांमध्ये चांगलाच वाद रंगला आहे. निवडणुकीवरुन काका पुतण्यामध्ये आरोप प्रत्यारोप केलं जात आहे.एकेकाळी मी शरद पवार यांना दैवत मानायचो, मात्र आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे असे मोठं विधान नुकतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्याबाबत केले आहे. पुण्यात अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधत असताना हे विधान केलं आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी दैवत कधी बदलत नसतं, असं म्हटलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून बारामतीमधल्या निवडणुकीवरुन पवार कुटुंबियांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. अजित पवार यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमधून शरद पवार यांच्याबाबत उघडपणे भाष्य केलं होतं. त्यावर शरद पवार यांनीही वेळोवेळी प्रत्युत्तर दिलं. मात्र आता शरद पवारांना आता मी दैवत मानत नाही अशा आशयाचे विधान अजित पवारांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणातून विविध प्रतिक्रिया येत आहे. अंबादास दानवे यांनीही माध्यमांशी बोलताना अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले अजित पवार?
"शरद पवार हे एक वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी केलेल्या विधानाबाबत बोलावं एवढा मी मोठा नाही. एकेकाळी मी त्यांना दैवत मानत होतो. आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे," असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
देव पावतोच असं होत नाही - अंबादास दानवे
"दैवत कधी बदलत नसतं. आपण सगळे ग्रामीण भागातील लोक आहोत. कित्येकवेळेस आपण दैवताना नवस करत असतो.पण देव पावतोस अशातला काही भाग नाही. मात्र देव पावला नाही म्हणून आपण देवताना नमस्कार करणं सोडत नसतो. नमस्कार करणं सोडलं म्हणजे याचा अर्थ आपण मनापासून त्यांना दैवत मानत नव्हतात," असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
ईडीच्या नोटीसीने दैवत बदललं - संजय राऊत
"अजित पवार यांनी दैवत बदललं आहे. २०२४ ला जेव्हा सरकार बदलेल आणि मोदी नसतील तेव्हा परत त्यांना ईडीची नोटीस येईल तेव्हा परत त्यांनी दैवत बदललेलं असेल. हे मोबाईल देवतांच्या मागे आहेत," अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.