'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 06:02 PM2024-04-29T18:02:20+5:302024-04-29T18:10:37+5:30

बारामतीमध्ये बोलताना अजित पवार यांनी मुख्ममंत्रीपदाबाबत मोठं विधान केलं होतं. त्यावर आता शरद पवार गटाने प्रतिक्रिया दिली आहे.

Baramati Loksabha Jitndra Awhad reply to Ajit Pawar who said he did not become Chief Minister | 'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर

'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर

Jitendtra Awhad On Ajit Pawar : पाच वेळा राज्याचे उपमुख्यमंत्रीपद भूषणवणाऱ्या अजित पवारांना मुख्यमंत्री पदाने नेहमीच हुलकावणी दिली आहे. मात्र आता गेल्या काही काळापासून अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा त्यांच्या कार्यकर्त्यांनीही वारंवार बोलून दाखवली आहे.अशातच आता एका मुलाखतीदरम्यान अजित पवार यांनी २००४ मध्ये मला मुख्यमंत्रीपद मिळालं असतं मात्र शरद पवारांनी त्यास नकार दिला असा आरोप केला आहे. यावर आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे.

२००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदाची संधी होती. छगन भुजबळ, आबा पाटील किंवा मला मुख्यमंत्रीपद मिळालं असतं. जर माझ्या नशिबात असतं तर मीही मुख्यमंत्री झालो असतो. मुख्यमंत्रीपद आलं होतं मात्र शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद घेण्यास नकार दिला, असं वक्तव्य  अजित पवार यांनी बारामतीतील प्रचारसभेत केलं होतं. त्यानंतर दिलेल्या मुलाखतीत ज्या वेळेस अजित पवारांना १४५ हा मॅजिक फिगर गाठता येईल. त्यावेळी मी मुख्यमंत्री होईल, असे म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाडांनी दिलं प्रत्युत्तर

यावर आता प्रत्त्युतर देताना जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना एक नंबरचे स्वार्थी असल्याचे म्हटलं आहे. "सन २००४ मध्ये मला साहेबांनी मुख्यमंत्री केले नाही, असे अजित पवार खासगीमध्ये बोलत आहेत. सन २००४ मध्ये नक्कीच राष्ट्रवादीच्या जास्त जागा निवडून आल्या होत्या. पण त्या जास्तीच्या जागा तुमच्यामुळे नाही तर कै.आर.आर. पाटील  यांच्यामुळे आल्या होत्या. आर.आर. पाटील यांनीच जेम्स लेन प्रकरणात कारवाई केली होती. समाज पेटून उठलेला असतानाही आम्ही जेव्हा जेम्स लेन आणि पुरंदरे यांच्यावर बोलत होतो. तेव्हा तुम्ही बोलू नका, असे सांगत होतात. २००४ मध्ये मुख्यमंत्रीपदासाठी पद्मसिंह पाटील,  विजयसिंह मोहिते-पाटील, आर.आर. पाटील, जयंत पाटील , मधुकरराव पिचड हेच लायक उमेदवार होते. पण या सर्व ज्येष्ठ नेत्यांना सोडून अजित पवार यांना मुख्यमंत्री केले असते तर जनमाणसात वाईट संदेश गेला असता म्हणून शरद पवार यांनी राजकीय मुत्सद्दीपणा दाखवून ५ अतिरिक्त महत्वाची मंत्रिपदे राष्ट्रवादीच्या वाट्याला मिळवून घेतली. अजित पवार तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद दिले. आता तुमच्या या खासगीतील चर्चेमुळे तुमचे स्वार्थाचे गणित उघड झाले आहे. साहेबांनी आपणाला मुख्यमंत्री केले नाही, हे सांगून अजित पवार हेच आता अप्रत्यक्ष सांगत आहेत की ,मी स्वार्थी नंबर १ आहे !," असे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले होते अजित पवार?

२०१४ ला साहेबांच्या मताप्रमाणे भाजपला बाहेरुन पाठिंबा दिला होता. २००४ साली मुख्यमंत्री मिळाले असते परंतु काँग्रेसला पद दिले. मी विकासासाठी मत मागतोय. मला बारामतीने आजपर्यंत भरभरून दिले आहे. विरोधकांना पंतप्रधान यांच्यावर टीका करायला जागा नाही, अशी टीका अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथे बोलताना केली होती. 

दरम्यान २००४ साली राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त जागा असूनही महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपद काँग्रेसला मिळाले होते. त्यावेळी अजित पवार २००४ साली मुख्यमंत्री होऊ शकले असते. कारण काँग्रेस-राष्ट्रवादीमधील सूत्रानुसार मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीला मिळणारच होतं. मात्र तसं झालं नाही आणि काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.
 

Web Title: Baramati Loksabha Jitndra Awhad reply to Ajit Pawar who said he did not become Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.