बारामतीमध्ये अजित पवार कुटुंबातीलच उमेदवार देणार असल्याच्या चर्चा आहेत. अझित पवारांनीही तसे संकेत काही दिवसांपूर्वी दिले आहेत. असे असताना अजित पवारांचे राजकीय विरोधक हर्षवर्धन पाटील यांनी बारामतीची जागा राष्ट्रवादीला दिल्याचे अद्याप ठरले नसल्याचा दावा केला आहे. यामुळे पुन्हा अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.
हर्षवर्धन पाटील काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये आले होते. पाटील यांनी आपल्या मुलीसाठी बारामती लोकसभा मतदार संघातून लढण्याची तयारी सुरु केली आहे. तसेच इंदापूर विधानसभेची चिंता कोणी करू नये, असे वक्तव्य देखील हर्षवर्धन यांनी केले आहे.
राष्ट्रवादीत फुट पडली आणि शरद पवार, अजित पवार असे दोन गट झाले. बारामती ही सुप्रिया सुळेंचा मतदारसंघ आहे. त्या शरद पवारांसोबत आहेत. बारामती मतदारसंघातून हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटलांनीही तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार दत्ता भरणे यांनी इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला होता. आता अजित पवार भाजपासोबत असल्याने तो मतदारसंघ कोणाला जाणार अशीही चर्चा रंगली आहे.