पुणे : जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या सभापतिपदांची आरक्षण सोडत गुरुवारी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. यामध्ये बारामती पंचायत समितीचे सभापतिपद अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठी, तर खेड पंचायत समितीचे सभापतिपद अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गासाठी आरक्षित झाले. या सोडतीमध्ये सभापतिपदासाठी अपेक्षित आरक्षण न पडल्याने अनेक इच्छुकांचा भ्रमनिरास झाला आहे.जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका जाहीर झाल्याने अनेक इच्छुक उमेदवार पंचायत समितीच्या सभापती सोडतीकडे डोळे लावून बसले होते. तर, काही विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सभापतिपदाचे आरक्षण आपल्याला अपेक्षित असे पडल्यास खालची निवडणूक लढविण्याच्या तयारी होते. आंबेगाव व मुळशी पंचायत समितीचे सभापतिपद नागरिकांचा इतर मागासप्रवर्ग (ओबीसी) महिलासाठी राखीव झाले आहे. यामुळे आरक्षण सोडतीसाठी जातीने हजर असलेले आंबेगाव तालुक्यातील विद्यमान व ज्येष्ठ सदस्य सुभाष मोरमारे यांचा भ्रमनिरास झाला. तर, वेल्हा पंचायत समितीचे सभापतिपद पुन्हा महिलेसाठी आरक्षित झाल्याने तेथील इच्छुक सदस्यही नाराज झाले. अनुसूचित जाती व जमातीची आरक्षण सोडत चक्राकार पद्धतीने काढण्यात आली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषद निवडणूक समन्वयक विक्रांत चव्हाण आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे उपस्थित होते.१३ पंचायत समिती सभापतिपदांची आरक्षणे बारामती - अनुसूचित जाती, खेड- अनुसूचित जमाती, मुळशी - नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला, आबेगाव- नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला, मावळ-नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), दौंड-नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), वेल्हा- सर्वसाधारण महिला, भोर- सर्वसाधारण महिला, जुन्नर- सर्वसाधारण महिला, हवेली- सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत. तर शिरुर, इंदापूर आणि पुरंदर या तीन पंचायत समित्यांचे सभापतिपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले आहे.
बारामती एससी, तर खेड एसटी महिलेसाठी आरक्षित
By admin | Published: January 20, 2017 12:42 AM