Baramati Vidhan Sabha: "भावी नव्हे, तर फिक्स आमदार"; बारामतीत होणार कडवी झुंज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 12:18 PM2024-08-25T12:18:22+5:302024-08-25T12:21:35+5:30

Baramati Vidhan Sabha election 2024: विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ हॉटसीट असणार आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना धक्का बसला होता. आता युगेंद्र पवार या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.

Baramati Vidhan Sabha: Bitter fight will between yugendra Pawar vs Ajit pawar in Baramati | Baramati Vidhan Sabha: "भावी नव्हे, तर फिक्स आमदार"; बारामतीत होणार कडवी झुंज

Baramati Vidhan Sabha: "भावी नव्हे, तर फिक्स आमदार"; बारामतीत होणार कडवी झुंज

Ajit Pawar Yugendra Pawar: लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ देशभरात चर्चिला गेला. अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी लढाई पहिल्यांदा या मतदारसंघात बघायला मिळाली. अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या मतदारसंघात अजित पवारांना धक्का बसला. आता विधानसभा निवडणुकीतही पवार विरुद्ध पवार अशीच लढत होण्याचे संकेत मिळत आहे. त्यात युगेंद्र पवारांच्या समर्थकांनी लावलेल्या बॅनर स्थानिक राजकारणाचा पारा चढला आहे. 

गोकुळाष्टमी निमित्त बारामती शहरात काही ठिकाणी बॅनर्स लागले आहेत. युगेंद्र पवारांच्या समर्थकांनी लावलेल्या बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे. 'भावी नव्हे, तर फिक्स आमदारच' अशा आशयाचे हे बॅनर्स आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून युगेंद्र पवार यांनाच बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यात हे बॅनर झळकल्याने चर्चेला बळ मिळाले आहे. 

शरद पवार युगेंद्र पवारांना उमेदवारी देणार?

लोकसभा निवडणुकीपासून युगेंद्र पवार बारामतीच्या राजकारणात जास्त सक्रीय झाल्याचे दिसत आहे. त्यांना विधानसभेला उमेदवारी द्यावी, अशी मागणीही कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे केली होती. 

काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनीही युगेंद्र पवार हे बारामतीत निवडणूक लढणार असल्याचे म्हटले होते. मावळमध्ये माध्यमांशी बोलताना पार्थ पवार म्हणाले होते की, "विधानसभा निवडणुकीत बारामतीत अजित पवार यांच्याविरोधात युगेंद्र पवार यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्याचे शरद पवार यांनी ठरवले आहे." 

"युगेंद्र पवार मोठे आहेत, निवडणूक लढवायची की नाही, हे त्यांनी ठरवावे. मात्र, या निर्णयामुळे काही फरक पडणार नाही. निवडून येण्यास अजित पवार यांना कोणतीही अडचण येणार नाही", असे भाष्य पार्थ पवार यांनी केले होते. 

बारामतीतून सुप्रिया सुळेंना मताधिक्य

2024 च्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभवाला सामोरे जावे लागले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुनेत्रा पवारांना बारामती विधानसभा मतदारसंघातूनच कमी मतदान झाले, तर सुप्रिया सुळेंना मताधिक्य मिळाले. 

2019 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना १ लाख ६५ हजारांपेक्षा जास्त मते मिळाली होती. अजित पवारांनी मोठे मताधिक्य घेत गोपीचंद पडळकर यांचा पराभव केला होता. पण, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांना ९६ हजार ५६० इतकी मते मिळाली, तर सुप्रिया सुळे यांना १ लाख ४३ हजार ९४१ मते मिळाली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार अशी लढत झाल्यास कुणाला धक्का बसणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे.

Web Title: Baramati Vidhan Sabha: Bitter fight will between yugendra Pawar vs Ajit pawar in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.