बारामती : शहरात ४० अंश सेल्सिअसवर तापमान गेले आहे. त्यामुळे लहान मुले, वृद्धांना या उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. तर घराबाहेर फिरणाऱ्या पुरुष, महिला टोपी, गाँगल, रूपाल, स्कार्फ चा वापर करीत आहे. त्यामुळे बाजारात या वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे दिसून आले. दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सक्तीची संचारबंदी असल्याचे चित्र उन्हामुळे दिसत आहे. यंदा उन्हाचा तडाका मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांची थंड पेय, रसवंती गृहात गर्दी दिसून येत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी शहरातील ज्युससेंटर, आॅइस्क्रम पार्लर, ऊसाच्या रसाचे ठेले, पाणी पाऊच आदींसाठी दुकानांमध्ये गर्दी आहे. त्याचप्रमाणे उन्हापासून बचाव करण्यासाठी टोप्या, रूमा, गॉगल्स, सनकोट, स्कार्प आदींची खरेदी होत आहे. मात्र, दुपारच्या वेळी ग्राहक कोणत्याही प्रकारच्या खरेदीला बाहेर पडत नाहीत, असे चित्र आहे. लग्नासराईदेखील जोरात सुरू असल्याने मिरवणूकीच्या निमित्ताने याची विक्रमी विक्री होतांना दिसून येत आहे. तसेच लग्नाकार्या निमित्ताने पाणी विक्रेत्यांकडून जारमधील पाणी देखील मोठया प्रमाणात मागविले जात आहे. तसेच मॅगो ज्युस, पायनपल ज्युस, मोसंबी ज्युस आदींची दुकाने मोठया प्रमाणात लागली आहे. काही संस्थाकडून शहरात ठिकठिकाणी पाणपोयी उघडण्यात आल्या आहेत. तसेच घरांवर उन्हापासून बचाव करण्यासाठी टाकण्यात येणारे हिरवे कापड, देखील मोठया प्रमाणात खरेदी केले जात आहे. शहरात तापमान मोठ्याप्रमाणात वाढले आहे. उन्हाच्या काहीलीपासून बचाव करण्यासाठी कुलर, एअर कन्डीशनला मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे येथील दुकानदार संतोष मुथा यांनी सांगितले. मागील १५ दिवसांपासून बारामतीचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या वरच आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी तर सक्तीची संचारबंदी असल्याचे रस्त्यावर पहाण्यास मिळते. बाजारपेठेत देखील आर्थिक उलाढाल मंदावली आहे. (प्रतिनिधी)
बारामतीचा पारा ४० अंश सेल्सिअसवरच
By admin | Published: April 27, 2016 1:19 AM