बारामती : दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. उन्हापासून बचावासाठी गमजे, टोप्या, गॉगल खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. वाढत्या उन्हामुळे दुपारच्या वेळी बारामती शहरातील मुख्य रस्ते ओस पडत आहेत. त्यामुळे बाजारपेठांवर देखील परिणाम झाला आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून सातत्याने ४० अंश सेल्सिअस तापमान आहे. रात्रीच्या उकाड्यातदेखील वाढ झाल्यामुळे वातानुकूलित यंत्रांना मागणी वाढली असल्याचे चित्र आहे. शहरात रसवंतिगृह ठिकठिकाणी थाटण्यात आली आहेत. उन्हाची तीव्रता असल्याने सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत महत्त्वाची कामे करून घेणे नागरिक पसंत करीत आहेत. सायंकाळी पाचनंतरही उकाडा कायम राहत आहे. वाढत्या उन्हामुळे फळांनादेखील मागणी वाढली आहे. दुपारच्या वेळी बाजारपेठेतील गर्दी ओसरत असल्याचेही चित्र आहे. उन्हामुळे अंगाची काहिली होत असल्याने नीरा डावा कालव्यात पोहण्याचा आनंद देखील तरुण मुले घेत आहेत. वाढत्या उन्हाचा डाळिंब, द्राक्ष आदी वेलवर्गीय फळांवर परिणाम होत आहे. उन्हापासून संरक्षण होण्यासाठी शेतकऱ्यांनी द्राक्ष, डाळिंब बागांना साड्यांनी झाकण्याचा प्रयत्न केला आहे. (वार्ताहर)द्राक्ष, डाळिंब छाटणी करणाऱ्या शेतमजुरांना दुपारच्या वेळेस सक्तीची विश्रांती घ्यावी लागत आहे. त्यामुळे दिवसभर उन्हात काम करूनही हवी तेवढी मजुरी त्यांना मिळत नाही. वाढत्या उन्हाच्या तापमानामुळे रानातील पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे.दुपारच्या वेळेस रस्ता निर्मनुष्य दिसत आहे. विनाकारण कोणीही घराबाहेर पडत नाही. जनावरांना उन्हाच्या तीव्रतेमुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. धापा टाकणे, तोंडाला फेस येणे यामुळे गुरे दगावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उन्हामुळे लहान मुलांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. शेतातील कामे अंतिम टप्प्यात आल्यामुळे शेतकरीही रानातील कामे दुपारची न करता विश्रांती घेत आहे. तसेच दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्यामुळे दुपारच्या वेळेस मुले पोहण्याचा आनंद घेत आहेत. चालू महिन्यातच उन्हाचा पारा वाढत असताना पुढील दोन महिन्यांत उन्हाचा पारा नक्कीच वाढणार आहे. ही चिंता शेतकरी, शेतमजुरांना सतावत आहे.कुरवली : कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहे. जसजसा दिवस चढत जाईल तसतशी उन्हाची तीव्रता वाढत जात आहे. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. बचावासाठी नागरिक झाडांच्या सावलीचा आधार घेत आहे.
बारामतीचा पारा ४० अंश सेल्सिअस
By admin | Published: April 03, 2017 1:45 AM