मुंबई : एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तब्बल २७ वर्षांनंतर मित्राला पाहून आनंदाने भारावून गेलेल्या डॉक्टरने आपल्या डॉक्टर मित्राला इतकी घट्ट मिठी मारली की त्याच्या तीन बरगड्या तुटल्या. मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयातील डॉक्टरबरोबर ही घटना १८ मार्चला घडली. आता या डॉक्टरची प्रकृती स्थिर आहे.डॉ. मधुकर गायकवाड हे सेंट जॉर्ज रुग्णालयात अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. डॉ. मधुकर यांचे मित्र डॉ. अमित बडवे हे तब्बल २७ वर्षांनी त्यांना भेटायला रुग्णालयात आले. या वेळी आपल्या जुन्या मित्राला पाहून डॉ. अमित यांना खूपच आनंद झाला. या आनंदाच्या भरात त्यांनी त्याला घट्ट मिठी मारली. मात्र, डॉ. मधुकर हे बेसावध असल्यामुळे त्यांची पहिली, दुसरी आणि सातवी बरगडी या मिठीमुळे तुटली. त्यामुळे ते खाली कोसळले. आता पुढचे १५ दिवस डॉ. मुधकर यांना पूर्ण आराम करण्यास सांगण्यात आले आहे. पुढच्या काही दिवसांत नैसर्गिकरीत्या त्यांच्या बरगड्या जोडल्या जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. मधुकर आणि डॉ. अमित यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. १९९० साली एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण झाल्यावर डॉ. मधुकर जे.जे. रुग्णालयात कामावर रुजू झाले. तर, डॉ. अमित यांनी अहमदनगर येथे खासगी प्रॅक्टिस सुरू केली. डॉ. अमित यांना शरीरसौष्ठवाची आधीपासूनच खूप आवड होती. त्यानंतर त्यांनी पदव्युत्तर शिक्षण आॅर्थोपेडिक्स शाखेत पूर्ण केले. (प्रतिनिधी)
मित्राच्या मिठीने मोडल्या बरगड्या
By admin | Published: March 22, 2017 2:34 AM