विवेक चांदूरकरबुलडाणा, दि. २१ : कपाशीवर बोंड अळी हल्ला करू शकणार नाही, या दृष्टीने संशोधकांनी बी. टी. कपाशीचे नवीन वाण तयार केले होते. मात्र, यामध्ये असलेल्या क्राय वन एसी या प्रथिनांविरूद्ध गुलाबी बोंड अळीने आपली प्रतिकार विकसित केली असून, आता बी. टी. कपाशीवरही या किडींनी हल्ला चढविला असल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील संशोधकांच्या निदर्शनास आले आहे.
कपाशीवर किडींचे आक्रमण होवू नये याकरिता क्राय वन एसी हे प्रथिने बियाण्यांमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. त्यामुळे बी. टी. कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव जाणवत नव्हता. मात्र, यावर्षीपासून कपाशी पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. किडींचे आक्रमण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे लाखो हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहे. तसेच संशोधकांनी बी. टी. मध्ये क्राय २ एबी हे प्रथिन समाविष्ट करून आणखी सुधारीत वाण विकसित केले. मात्र, गुलाबी बोंड अळीमधील प्रतिकारशक्ती आता या वाणाविरूद्धही विकसित होत असल्याचे निदर्शनास आले असल्याचे कृषि तंत्र विद्यालय, बुलडाणाचे प्राचार्य डॉ. गिरीश जेऊघाले यांनी सांगितले.
वऱ्हाडात बीटी कपाशीला मान्यता मिळाल्यानंतर दरवर्षी फार मोठ्या प्रमाणावर बीटी कपाशीची लागवड होत आहे. त्यामुळे बोंडअळ्यांच्या व्यवस्थापनाकरीता होणाऱ्या कीटकनाशकांच्या फवारण्यामध्ये लक्षणीय घट झाली. परंतु बीटी कपाशी लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी शिफारशीय पद्धतीने न वापरल्यामुळे प्रामुख्याने गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव बीटी कपाशीवर आढळून येत आहे. यावर्षी ही कीड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतावर आढळून येत आहे. त्यामुळे गुलाबी बोंडअळीचा बीटी कपाशीवरील प्रादुर्भाव थांबविणे आवश्यक झाले आहे. शेतकऱ्यांनी गुलाबी बोंडअळी प्रादुर्भावग्रस्त फुले (डोमकळी) ओळखून वेळीच व्यवस्थापनाचे उपाय अंमलात आणले तर गुलाबी बोंडअळीच्या पुढच्या पीढीस अटकाव करुन होणारे संभाव्य नुकसान टाळू शकतात.
या बोंडअळीची वाढ साधारणत: उष्ण व ढगाळ वातावरण आणि हलका पाऊस असल्यास झपाट्याने होते. या बोंडअळीचा प्रादुर्भाव हिरव्या बोंडामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. एकदा का अळी बोंडामध्ये शिरली की बोंडावरील छीद्रबंद होतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच नियोजन करणे आवश्यक असल्याचे प्रा. जेऊघाले यांनी सांगितले.