मुंबई : येत्या २४ डिसेंबर व ३१ डिसेंबर रोजी बार आणि रेस्टॉरंट रात्रभर सुरू राहणार असून, पहाटे ५ वाजेपर्यंत खुले ठेवण्यास शासनातर्फे परवानगी देण्यात आली आहे. असे असले तरी या दिवशीच्या परिस्थितीवर पोलीस करडी नजर ठेवणार आहेत. करापोटी मिळणाऱ्या महसुलामध्ये वाढ होण्यासाठी या दोन दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत बार सुरू ठेवण्याची परवानगी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, असे उत्पादन शुल्क विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनवेळी मद्याच्या नशेत असणाऱ्यांकडून विघातक कृत्य केले जाते. गेल्या काही वर्षांपासून या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या घटना रोखता याव्यात म्हणून पोलिसांकडून बार व रेस्टॉरंट रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यास मनाई केली जाते. परिणामी, त्याविरुद्ध बारमालक व हॉटेलचालकांना न्यायालयात धाव घेऊन त्याबाबत सूट मिळवावी लागते. या वर्षी मात्र उत्पादन शुल्क विभागाने दोन दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत बार व रेस्टॉरंट सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. (प्रतिनिधी)
२४, ३१ डिसेंबरला रात्रभर बार व रेस्टॉरंट खुले
By admin | Published: December 22, 2015 2:13 AM