सोलापूर : पणन मंडळाने चुकीचा अभिप्राय दिला व जिल्हा उपनिबंधकांनी चुकीच्या पद्धतीने आदेश काढल्याचा ठपका उच्च न्यायालयाने ठेवल्यानंतर राज्य सरकारने बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करण्याचा आदेश मागे घेत असल्याचे न्यायालयात सांगितले. पणन मंडळाच्या शिफारशीनुसार सोलापूर जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव यांनी १९ आॅगस्ट रोजी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त केले होते. या आदेशाला अशोक बोधले व तानाजी मांगडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. गुरुवारी न्यायमूर्ती शंतनू केमकर व मकरंद कर्णिक यांच्यासमोर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी उपनिबंधकांनी दिलेल्या कारणे दाखवा नोटीसला दिलेल्या उत्तराचा निबंधकांनी कारवाई अगोदर कसलाही विचार केला नाही. प्रशासक नियुक्ती अगोदर मार्केटिंग फेडरेशनसोबत सल्लामसलत करणे बंधनकारक असताना ते केले नाही, परंतु केल्याचे वरकरणी दाखविल्याचे न्यायालयाच्या निदर्शनाला आणले. (प्रतिनिधी)
बार्शी बाजार समिती बरखास्तीचा आदेश रद्द
By admin | Published: September 09, 2016 5:14 AM