सचिन जवळकोटे, कार्यकारी संपादक, सोलापूर
महाराष्ट्रात वर्षभर धूमधडाक्यात चालतात गावच्या जत्रा, देवाच्या यात्रा अन् सणांचे उत्सव. पाचशेहून अधिक ठिकाणी होणाऱ्या या सर्व जत्रा-यात्रांमधून वर्षाकाठी कमीत-कमी एक हजार कोटींची उलाढाल.
पूर्वी रब्बी हंगाम संपल्यानंतर घरात धान्याच्या राशी लागलेल्या. कामाचा शीणही आलेला. खिशातल्या पैशाला थोडासा विरंगुळा मिळावा म्हणून ‘नव्याची पौर्णिमा’ साजरी करण्याची प्रथा रुजत गेली; मात्र ‘शिव’काळात शेतातली कामं संपली की सारे ‘मावळे’ एकत्र जमून उन्हाळ्यातल्या युद्ध मोहिमेची आखणी करायचे. कुलदैवतासमोर एकनिष्ठतेच्या शपथा घ्यायचे. नैवेद्य दिला जायचा. बायका-पोरंही तोपर्यंत खरेदी-विक्री अन् मनोरंजनात रमायची. हेच स्वरूप हळूहळू विस्तारत गावच्या जत्रेपर्यंत पोहोचलं. पूर्वी जत्रेत व्यवहार व्हायचे, ते बिनपैशांचे. अर्थात ‘बार्टर’ सिस्टीम. किलोभर ज्वारीच्या बदल्यात हातभर बांगड्या. ‘अंगणेवाडी भराडीदेवी, जातेगाव कालभैरव, श्रीनाथ म्हस्कोबा, अमरावती बहिरम, चंद्रपूर महाकाली अन् सोलापूर गड्डा’ या महाराष्ट्रातल्या मोठ्या यात्रा. बुलढाण्यातल्या सैलानीची जत्रा गाढवांच्या बाजारासाठी तर नंदूरबारमधल्या सारंगखेड्याची जत्रा घोड्यांसाठी प्रसिद्ध. राज्यात सर्वांत मोठी यात्रा नांदेडच्या माळेगावची. इथले घोडे विकत घेण्यासाठी येणाऱ्या राजकीय नेत्यांसाठी खास ‘हेलिपॅड’ बांधणारी ही यात्रा. साताऱ्याची पुसेगाव यात्रा बैलगाडी स्पर्धेसाठी लोकप्रिय. कुंडलची कुस्ती यात्रा असो वा नारायणगावची तमाशा पंढरी. प्रत्येकानं आपापली खासियत निर्माण केलेली.
मोठ्या शहरातील मॉल संस्कृतीची सवय लागलेली मंडळी आजही गावाकडच्या यात्रेतल्या छोट्या-मोठ्या वस्तू मोठ्या हौसेनं विकत घेतात; याला कारण हरवलेलं बालपण या यात्रांमधून शोधण्याची भावनिक धडपड. कोकणातल्या ‘दशावतार’ कार्यक्रमाला मुंबईचे चाकरमानी आवर्जून उपस्थित राहतात, तेव्हा ‘अंगणेवाडी’ जाते भारावून. महाराष्ट्रात एक लाखाहून अधिक गर्दी खेचणाऱ्या जत्रांची संख्या पन्नासहून अधिक. एक व्यक्ती कमीत-कमी सरासरी पाचशे रुपये खर्च करत असेल या हिशेबानं आकडा अडीचशे कोटींच्या वर. शहरी भाविकांच्या प्रवासाचा खर्च तर याहून दुप्पट. हा झाला जत्रांचा बाजार.
खरेदी-विक्री : गृहोपयोगी, हस्तकला, बलुतेदारांच्या वस्तू, गावरान मसाले.
करमणूक : ॲम्युझमेंट, खेळणी, ऑर्केस्ट्रा अन् जादू.
देणगी : यात्रेतील देवतेला दान,
नवस अन् नैवेद्य.
शर्यती : कुस्ती मैदान तसेच श्वान, घोडे अन् बैलगाड्यांच्या स्पर्धा.
पंढरपूर, तुळजापूर, जेजुरी अन् जोतिबासारख्या यात्रांची उलाढाल तर हिशेब करण्याच्या पलीकडची. आजकाल अक्कलकोट अन् शिर्डीसारखी तीर्थस्थानं तर वर्षभर बहरलेली. काही जत्रा तर ‘कॉर्पोरेट’ कंपन्यांनीच हायजॅक केलेल्या. उत्तर प्रदेशनं अलीकडं वाराणसी ते अयोध्येपर्यंत ‘टेम्पल टुरिझम’च्या माध्यमातून नव्या उत्पन्नाचा स्रोत शोधलेला.
महाराष्ट्रात तर याहूनही अधिक धार्मिक स्थळं. तीही श्रद्धेनं फुललेली, नवसाला पावणारी. त्यामुळं सरकारी पातळीवर ‘कुंभमेळ्यां’च्या धर्तीवर नियोजन झालं तर बहुतांश मोठ्या जत्रांना मिळेल मोठी आर्थिक ताकद. पूर्वी जत्रांसाठी गावी सात-आठ दिवस मुक्काम करणाऱ्या चाकरमान्यांची मानसिकता आता बदलत चाललेली.
गावाकडच्या भावकीला त्रास नको म्हणून वन-डे ट्रीप करणाऱ्यांची संख्या वाढलेली; त्यामुळे तात्पुरत्या मुक्कामाच्या ‘टेन्ट’ची गरज. परवाच्या ‘शिवजयंती’ला शिवनेरी किल्ल्यावर हा प्रयोग करण्यात आलेला. जवळपास सत्तर टेन्टचा कँप उभारण्यात आला होता. याला प्रतिसादही चांगला मिळाला. हाच प्रयोग गावोगावच्या जत्रांमध्येही करायला हरकत नसावी, अशी मागणी केलीय जत्रांमध्ये इव्हेंटचे मॅनेजमेंट सांभाळणारे संदीप गिड्डे यांनी.