ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 16 - सात वर्ष जुन्या हत्या प्रकरणात सत्र न्यायालयाने दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे एका नऊ वर्षांच्या चिमुरडीने दिलेल्या साक्षीच्या आधारे ही शिक्षा सुनावण्यात आली. ही हत्या होताना या चिमुरडीने स्वत: डोळ्यांनी पाहिलं होतं.
घटना ऑक्टोबर 2010 मधील आहे. मृत पावलेल्या शिवाजीला संशय होता की आपल्या पत्नी आणि मित्र विजयचं अफेअर चालू आहे. 2 ऑक्टोबर 2010 रोजी जेवण झाल्यानंतर शिवाजीने आपली पत्नी कमलाबाईसोबत शारिरीक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. कलमाबाईने नकार दिल्याने त्यांच्यात भांडण झालं, यानंतर शिवाजीने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान कमलाबाईने शिवाजीला घराबाहेर काढण्यासाठी आपल्या मित्राद्वारे पासवान उर्फ लंबू भाई आणि फारुख यांना बोलावलं. पण त्या दोघांना पाहून शिवाजीचा पारा अजून चढला आणि त्याने भांडण्यास सुरुवात केली. नंतर कमलाबाई आणि फारुखने शिवाजीला पकडून ठेवलं, आणि पासवानने दोरीच्या सहाय्याने त्याचा गळा आवळला.
ही सर्व घटना कमलाबाईच्या शेजारी राहणा-या नऊ वर्षाच्या मुलीने पाहिली होती. पत्र्याला असलेल्या भगदाडेतून तिने ही हत्या पाहिली. चिमुरडीने न्यायालयात सांगितलं की, 'पासवान आणि शिवाजीमध्ये भांडण सुरु होतं. तेव्हा फारुख आणि कलमाबाईने शिवाजीला पकडलं. यानंतर पासवानने शिवाजीच्या गळ्यात दोरी टाकून हत्या केली'. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार न्यायालयात सांगण्यात आलं की, आरोपींनी पुरावा मिटवण्यासाठी शिवाजीच्या मृतदेहाचे तुकडे केले. न्यायालयाने फारुख आणि कमलाबाईला दोषी करार दिला आहे.