शिवाजी गोरे-- दापोली --स्वत:चे दु:ख बाजूला ठेवून समाजाच्या हितासाठी मेणबत्तीसारखी झिजून कोट्यवधी बौद्ध बांधवांच्या जीवनात प्रकाश पाडण्याचे काम करणाऱ्या कौटुंबिक सुखाचा त्याग करून देशहितासाठी व समाजाच्या उद्धारासाठी बाबासाहेबांना अत्यंत मोलाची साथ देणाऱ्या रमाई भीमराव आंबेडकर यांचे वणंद हे माहेर गाव आहे. आपल्या कर्तृत्त्वाने संपूर्ण जगभर कीर्ती पसरविणाऱ्या मातेच्या जन्मगावाकडे मात्र शासनाचे दुर्लक्ष झाल्याने हे गाव २०व्या शतकातही पायाभूत सुविधांपासून वंचित आहे. दापोली तालुक्यातील वणंद येथील भिकूजी धोत्रे व रुक्मिणी धोत्रे यांच्या पोटी १८९७ साली रमार्इंचा जन्म झाला. भिकूजी धोत्रे यांचे घराणे वारकरी पंथाचे होतं. परंतु कुटुुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ते हर्णै बंदरात माशांच्या टोपल्या वाहून नेणाऱ्या श्रमिकाचे काम करायचे. एकेदिवशी माशांच्या टोपल्या वाहताना रक्त उलटून पडल्याने भिकूजी वारले. त्याअगोदर रुक्मिणी यांचाही मृत्यू झाला होता. अवघ्या ८ वर्षांच्या रमाई आई-वडिलांचे छत्र हरपल्याने पोरक्या झाल्या. भिकूजी धोत्रे यांना चार अपत्ये होती. यापैकी एका मुलीचे लग्न झाले होते. इतर तीन मुले लहान असल्याने त्यांच्यावर आभाळ कोसळले. त्यामुळे मुंबई येथे पोलीस खात्यात असणाऱ्या मामाने या तीन भावंडांना मुंबईला नेले. मुंबईत भायखळा या ठिकाणी रमार्इंचे बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी लग्न झाले. त्यावेळी रमार्इंचे वय होते ९ वर्षे, तर भीमरावांचे वय होते १६ वर्षे. यापूर्वी भीमरावांचे दोन साखरपुडे मोडले होते आणि जात पंचायतीने सुभेदार रामजी सपकाळ (आंबेडकर) यांना ५ रु पये दंड ठोठावला होता. तो दंडही त्यांनी भरला होता. रमाई मात्र सून म्हणून रामजीना खूप आवडली होती. रामजी सुभेदार (गुरुजी) यांनी केलेल्या संस्कारांची शिदोरी आयुष्यभर त्यांच्यासोबत राहिली.यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. याप्रमाणे रमाई आयुष्यभर बाबासाहेबांच्या सुख - दु:खात सावलीप्रमाणे ठामपणे उभ्या राहिल्या. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कुटुंबाचा गाढा त्यांनी ओढला. रमाई व बाबासाहेब यांना ४ अपत्ये होती. त्यातील भय्यासाहेब राहिले. इतर ३ अपत्ये अल्पावधीतच वारली. बाबासाहेबांच्या आणि समाजाच्या सुखापुढे रमार्इंना स्वत:ची दु:खे व सुखे कवडीमोल वाटली.दलितांना हक्काचे पाणी मिळावे म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड चवदार तळ्यावर सत्याग्रह केला. सत्याग्रहासाठी देशभरातून दलित बांधव आले होते. परंतु सत्याग्रह करणाऱ्या बांधवाची होणारी उपासमार पाहून रमार्इंनी सत्याग्रहींसाठी भाकरीचे गाठोडे पाठविले. सत्याग्रहींसाठी त्या स्वयंपाकीण बनल्या. पोटच्या पोराप्रमाणेच दलित सत्याग्रहींची काळजी त्यांना वाटत होती. त्यांचा लढा हा समाज हिताचा होता. बाबासाहेबांच्या लढ्याला यश यावे, म्हणून त्या पडद्यापाठीमागची सर्व कामे करत होत्या. अखेर महाड चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला यश आले.उच्च शिक्षणासाठी बाबासाहेब लंडनला गेल्यानंतर कुटुुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलली. दीर आनंदराव यांच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटुंबही आपलेच आहे, असे मानून काबाडकष्ट करुन दोन्ही कुटुंबांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी पार पाडली. बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले आहेत व रमाई हलाखीचे जीवन जगत असल्याचे कळताच काही पुढाऱ्यांनी दोनशे रुपयांची थैली पाठविली. ती थैली स्वाभिमानी रमार्इंनी परत करत ती रक्कम एखाद्या वसतिगृहाला देणगी द्या, असे सांगून आपण आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यास समर्थ असल्याचे दाखवून दिले. पुढाऱ्यांची लाचारी न पत्करत आपल्या पतीची इभ्रत सांभाळत वरळी येथे शेणी (गोवऱ्या) थापण्याचे काम केले. कष्टाचे काम करुन कुटुंबाची जबाबदारी पार पाडली. बाबासाहेबांना धीर देत तुम्ही उच्च शिक्षण घ्या, कुटुंबाची काळजी करु नका, असा सल्लाही दिला होता. पतीना समर्थपणे साथ देऊन बाबासाहेबांच्या सामाजिक कार्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या रमार्इंचे त्याग हा समाज विसरलेला नाही. रमाई बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या नसत्या तर कदाचित बाबासाहेब लंडनला गेले नसते व बॅरिस्टर होऊ शकले नसते, असा मतप्रवाह समाजामध्ये आहे.बाबासाहेब १४ एप्रिल १९२३ला लंडनहून आपला अभ्यास पूर्ण करुन भारतात परतले. बाबासाहेबांच्या येण्यामुळे आपला संसार सुखी होईल, असे रमार्इंना वाटले होते. परंतु बाबासाहेब लंडनहून परत आल्यावर मात्र त्यांनी दलित बहुजनांच्या उद्धारासाठी झोकून घेतले. त्यामुळे कुटुंबापेक्षा समाजाचे सुख महत्त्वाचे मानून रमार्इंनी बाबासाहेबांच्या सामाजिक कार्याला पाठिंबा देऊन शेवटपर्यंत खंबीरपणे साथ दिली.आपल्या कार्याचा गाजावाजा नाही, मोठेपणाची हाव नाही, मातृहृदय आपले कर्तव्य करीत राहिले. दीनदुबळ्या समाजाची सेवा हेच आपले कर्तव्य मानून त्या आयुष्यभर काम करीत राहिल्या. बाबासाहेबांच्या समाजकार्यात अडथळा निर्माण करण्याचे व जीवे मारण्याचे अनेक प्रयत्न झाले. बाबासाहेबांना धमकीची पत्रसुद्धा येत होते. तरी त्या घाबरल्या नाहीत. सतत काम, चिंता, बाबासाहेब व दलित समाजाच्या हिताचा घेतलेला ध्यास यामुळे त्या आजारी पडल्या. २७ मे १९३५ला रमार्इंची प्राणज्योत मालवली. कोट्यवधी दीनदुबळ्यांची आई जगाचा निरोप घेऊन गेली. मात्र तिने केलेल्या कर्तृत्त्वाने ती साऱ्या जगाची रमाई बनली.माता रमाई १९३० साली धारवाड येथे गेल्या होत्या. हवापालट करण्यासाठी बाबासाहेबांनी त्यांना धारवाड येथे पाठविले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत शिक्षण हा महत्त्वाचा भाग होता. त्यांनी धारवाडला गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह काढले होते. या वसतिगृहाचे अधीक्षक बळवंतराव वराळे होते. वसतिगृहात ३० ते ३५ विद्यार्थी होते. जिल्हा लोकल बोर्डाची निवडणूक असल्याने बोर्डिंग अनुदान मिळाले नव्हते. त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांची उपासमार होत असल्याने वराळे चिंताग्रस्त झाले होते. वसतिगृहातील मुलांना जेवणासाठी काही नाही, असे रमार्इंच्या लक्षात आले. लगेचच त्यांनी १०० ची नोट काढून दिली. जेवणाचे सर्व साहित्य आणायला सांगितले. त्यांनी विचार केला, बोर्डिंग आमची, मुले आमची, ताबडतोब मुलांना जेवू घालणे हे आमचे कर्तव्य आहे. रमाई एवढ्यावरच थांबल्या नाहीत, तर त्या आपल्या खोलीत गेल्या ट्रंकेतून त्यांनी चार सोन्याच्या बांगड्या काढून आणल्या व ते दागिने अधीक्षक वराळेंकडे देऊन कोणाकडे तरी गहाण ठेवा व या मुलांच्या जेवणाची व्यवस्था करा. बी. सी. मशीन वसतिगृहातील एकही विद्यार्थी उपाशी राहणार नाही, याची काळजी घ्या. बाबासाहेब आल्यावर दागिना सोडवून घेतील, असे त्यांनी सांगितले. आपल्या वसतिगृहातील गरीब विद्यार्थ्यांसाठी रमार्इंचे औदार्य पाहून वराळेंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. यामधून माता रमार्इंचा त्याग दिसून येतो. माता रमार्इंचा जन्म वणंद गावातील बौद्धवाडीत झाला होता. त्या वाडीकडे जाणारा रस्तासुद्धा २० वर्षांपूर्वी नव्हता. शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या वाडीकडे जाणारा रस्ता होण्यासाठी दापोली कृषी विद्यापीठातील श्रीरंग रोडगे व त्यांच्या सहकाऱ्याने श्रमदानातून हा रस्ता केल्यावर शासनाला जाग आली.वणंद - बौद्धवाडी शासन दरबारी दुर्लक्षित होती. रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य, शौचालयाचा अभाव होता. वणंद हे रमार्इंचे माहेर असल्याने, मीराताई आंबेडकर यांनी माता रमार्इंच्या माहेरी वणंद येथे माता रमाई स्मारक उभे करण्यात आले आहे.वणंद येथील माता रमाई स्मारकाला लाखो बौद्ध बांधव नतमस्तक होत असून, गेल्या वर्षी रमाई जयंतीनिमित्त लाखो बौद्ध बांधवांनी हजेरी लावून माता रमार्इंच्या जन्मभूमीत माथा टेकला. माता रमार्इंच्या गावाला लाखो बौद्ध बांधवांनी भेट दिल्याने हे गाव अचानक प्रकाशझोतात आले. या गावाला पर्यटन दर्जा देण्यात येण्याची मागणी केली जात असून, वणंद गावाला पर्यटन सुविधांचा अभाव आहे.
रमार्इंच्या माहेरी मूलभूत सोयींचीही वानवा
By admin | Published: November 19, 2015 9:20 PM