मुंबई : अल्झायमरग्रस्तांची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे काम असते. त्याचबरोबरीने त्यांच्यासाठी पुनर्वसन केंद्र असण्याची गरज आहे. पण, देशात, राज्यात अशा पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे अल्झायमरग्रस्तांना आणि त्यांची काळजी घेणाऱ्यांनाही याचा खूप त्रास सहन करावा लागतो. अल्झायमर या आजारात मेंदू आक्रसला जात असल्यामुळे त्याचा थेट परिणाम शरीरावर होतो. प्राथमिक अवस्थेत वागण्यात बदल होतात. पण, त्यानंतर शारीरिक बदल दिसून येतात. त्यामुळे या रुग्णांची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. अल्झायमरग्रस्तांना एकटे सोडू नये असे डॉक्टर सांगतात. त्यामुळे कालांतराने त्यांच्याबरोबर राहणाऱ्या व्यक्तीलाही याचा त्रास होऊ लागतो, असे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी सांगितले. तसेच अल्झायमरग्रस्तांना घरी काळजी घेणाऱ्या प्रशिक्षित व्यक्ती असायला हव्यात. त्याचबरोबर वेळीच या रुग्णांना औषधोपचार सुरू करण्याची गरज असते. त्यामुळे या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार व्हायला हवा, असे डॉ. शेट्टी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
अल्झायमरग्रस्तांना हव्यात पायाभूत सुविधा
By admin | Published: September 21, 2016 2:30 AM