मुंबई, दि. 21 - सोशल मीडियाच्या नादी लागायच नसतं त्याला ना आई असते ना बाप, अस वर्षभरापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले होते. फेसबुक, टि्वटरच काय आपण व्हॉटस अॅपही वापरत नाही अस राज ठाकरे लोकमतच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते. पण तेच राज ठाकरे भविष्यातील निवडणुका जिंकण्यासाठी आता सोशल मीडियाचा आधार घेत आहेत.
जनतेशी संवाद साधण्यासाठी, माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी आपण फेसबुक पेज सुरु करत आहोत असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं. जगात ज्या चांगल्या गोष्टी आहेत, डॉक्युमेंट्रीज आहे त्या तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी फेसबुक पेज सुरु करण्याचा निर्णय घेतला. या पेजवरुन राज ठाकरे त्यांची व्यंगचित्रही शेअर करणार आहेत. मनसेमध्ये अनेकजण उत्तम काम करत आहेत, फेसबुक पेजच्या माध्यमातून ती काम तुमच्यासमोर आणणार असल्याचे राज यांनी सांगितले.
भाजपाने निवडणुका जिंकण्यासाठी सोशल मीडियाचा भरपूर वापर केला. आता तोच सोशल मीडिया अंगाशी येतोय, तेव्हा अमित शहा सोशल मीडियावर विश्वास ठेऊ नका असे सांगत आहेत. भक्तांनी आता पट्टया काढल्या आहेत अशी टीका राज ठाकरेंनी केली. ते त्यांच्या फेसबुक पेज लाँचच्या कार्यक्रमात बोलत होते.
नरेंद्र मोदींचे 48 टक्के तर, राहुल गांधींचे 54 टक्के फॉलोअर्स फेक खोटे आहेत पण आपण फेसबुक पेजवर जे करु ते खर असेल, कुठलेही फुगवलेले आकडे नसतील असे राज ठाकरे म्हणाले. सोशल मीडियामुळे आता काहीही लपून राहणार नाही. तुम्ही कितीही खोट बोललात तरी सत्य वर येणारच असा राज यांनी सांगितले.
महिन्यात एकदा आपण फेसबुक लाईव्ह करणार असून, त्यावेळी जनता, कार्यकर्त्यांशी संवाद साधू. त्यांच्या समस्या ऐकू असे राज यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अखेरीस त्यांनी 7666662673 हा क्रमांक सुद्धा कार्यकर्त्यांना दिला. यापूर्वी सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव्ह नसलेले राज ठाकरे याच पेजचा वापर प्रचारासाठी, स्वत:ची मतं मांडण्यासाठी, सरकारवर टीका करण्यासाठी वापरणार आहेत.
मागील निवडणुकांमधील सततच्या पराभवानंतर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पक्षाची मोट बांधायला सुरुवात केली असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून या फेसबुक पेजचा वापर केला जाणार आहे. गेल्या काही वर्षात सोशल मीडिया हे प्रचार, प्रसाराचं महत्त्वपूर्ण माध्यम म्हणून पुढे येत आहे. निवडणुकीच्या वेळीही सोशल मीडियाचा पुरेपुर वापर केला जातो.