- डॉ. श्रीकृष्णबुवा सिन्नरकरज्येष्ठ कीर्तनकार
कुंभमेळ्याला पौराणिक व धार्मिक महत्त्व तर आहेच; शिवाय त्याला वैज्ञानिक आधारही आहे. सिंहस्थ पर्वकाळात अदृश्यपणे भारतातील भागीरथी (गंगा), नर्मदा, कृष्णा, कावेरी, क्षिप्रा आदी पुण्यवान जलांचा गोदावरीच्या राम तीर्थात निवास होतो. त्यावेळी गुरू ग्रह हा सिंह राशीचा स्वामी सूर्य यांच्या गुरुत्वाकषर्णाने विशिष्ट अक्षांशांत विद्युत लोहचुंबकाप्रमाणे अणू सिद्धांतानुसार विद्युतलहरी निर्माण होतात व त्या जलप्रवाहात कार्यान्वित होतात. या जलप्रवाहाचा शरीरावर व मनावरही परिणाम होतो. विज्ञानामध्ये प्रकाशाला दोन प्रकारच्या कल्पना आहेत. एक : प्रकाश ‘द्रव्य’ व दुसरी : प्रकाश ‘लहरी’. या दोन्ही कल्पनांना परमाणू कल्पनेने बांधून ठेवले आहे. त्यामुळे एकीत स्थूलद्रव्य कल्पना, तर दुसरीत इथरच्या परमाणूची कल्पना मानल्याशिवाय कंपनच होत नाही किंवा होणारही नाही. ‘सायन्स’ शब्दाचा अर्थ केवळ विज्ञान किंवा कौशल्य एवढाच होत नसून, शास्त्रीय पद्धतीने निरीक्षण, तत्त्वचिंतन, प्रयोग व परीक्षण असा होतो. अर्थात त्याला ‘सायंटिफिक मेथड’ असे म्हणतात व त्याचे क्रियाविशेषण ‘सायंटिफिकली’ होते. त्यामुळे येथे ‘थिअरी’ प्रत्यक्षात सिद्ध करावी लागणार. येथे विद्युत संबंध आल्यामुळे ‘इलेक्ट्रॉन थिअरी’नुसार ती सजातीय अॅटॉमिक थिअरी आहे, हे मान्य करावे लागते. वेदान्ताच्या शास्त्ररूपासंबंधी गुणवाद व सांख्यशास्त्राप्रमाणे रूपद्रव्यवाद एकत्र केल्यास परमाणूंचे कंपन प्रकाशसिद्ध होते, हे प्रयोगाने मान्य होते. प्रयोगशाळेतही ते सिद्ध झाले आहे. (ही चर्चा विष्णुपुराणात आलेली आहे.) जी सूर्याची किरणे ब्रह्मसभेकडे जातात, ती सभेच्या प्रकाशाने कुंठित होऊन परत येतात. यावरून प्रकाशाची गती व किरण प्रवर्तन (रिफ्लेक्शन) हे आपल्याकडे ज्ञात होते. तथापि, हे आता विज्ञानाने प्रायोगिक दृष्टीने सिद्ध केले आहे. त्यावरून वेदान्ती म्हणतात त्याप्रमाणे ते वायुजन्य तेज ठरते. एकंदरीत प्रकाश, उष्णता हे तेजाचे धर्म असून, वायुस्थ गतिजन्य आहे व ते विज्ञानदृष्टीने विशिष्ट अक्षांशांमध्ये गुरुत्वाकर्षणात चुंबित होते. हा योग सिंहस्थ महापर्वकाळात गोदावरी नाशिकच्या क्षेत्रातच घडून येतो.येथे धार्मिक श्रद्धेचा संबंध असे म्हटल्यास श्रद्धा व लॉजिक यांचा संबंध असा आहे, की श्रद्धा ही मानली जाते व ती लॉजिकली देण्याचा यथार्थ प्रयत्न होतो. शिवाय भौतिक किंवा विज्ञानशास्त्र हे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश (दिशा) या पांच द्रव्य तसेच रूप, रस, गंध, स्पर्श, परिणाम, पृथकत्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, द्रव्यत्व, स्नेह, शब्द, स्थितीस्थापकत्व व वेग हे गुण (संस्काराचे भेद, उत्क्षेपण, अपक्षेपण, प्रसारण, आकुंचन व गती हे पाच कर्म एवढ्या विचाराने भौतिकशास्त्र पूर्ण होते. त्यातील काही गोष्टी इंद्रिय विज्ञानात तर काही गणितशास्त्रात येतात. त्यापासून व त्यांच्या साहाय्याने भौतिक सुखाची वाढ होते; परंतु अध्यात्म व धर्म हा पुरुषार्थ मनाला शांत ठेवतो. विज्ञान या निष्कर्षावर आले आहे की, या विश्वाच्या बुडाशी आधारभूत संकल्पवान, ज्ञानस्वरूप व संवेदनात्मक शक्तिस्वरूप मूलतत्त्व असले पाहिजे. विश्व नियामकत्व ज्ञानस्वरूप हे सचेतन स्वरूप असते व आहे. कारण पदार्थविज्ञान (फिजिक्स) व रसायनविज्ञान (केमिस्ट्री) या दोन विज्ञान शाखांनी प्रारंभी विश्वाचे मूळ कारण जड परमाणू ठरवला आहे; परंतु त्याच विज्ञानाने त्यापुढील संशोधनाने हा निष्कर्ष खोटा ठरवला व परमाणू हा विच्छेद्य असून, परमाणू हे धन व ऋण या दोन प्रकारच्या विद्युतकणांचे बनले आहेत. धन विद्युत कणाभोवती ऋण विद्युत कण अखंड व कल्पनातीत गतीने फिरत आहेत व तेच परमाणू स्वरूप आहे, असा नवा निष्कर्ष त्याच विज्ञानाने काढला आहे. त्यामुळे ‘जडवाद’ हा नष्ट झाला आहे. कारण भौतिक विश्वाचे मूलतत्त्व गतिमान विद्युतकण ठरले म्हणून सचेतन ठरते. सिंहस्थात गुरू ग्रह सिंह राशीत प्रवेश केल्यावर विद्युत शक्तीचे व ऊर्जाप्रवाहाचे परिणाम गोदाजलावर अक्षांश आकर्षणाने (जसा समुद्राच्या भरती-ओहोटीवर चंद्राचा परिणाम नित्य होत असतो व तो मान्य आहे) विशिष्ट वेळी होतो. यावरून वैज्ञानिक दृष्टीने सिंहस्थाचे महत्त्व मोठे असल्याचे सिद्ध होते. हे समजल्यावर भौतिक सुखाबरोबरच मनाला शांती व समाधान देणारा ‘धर्म’ हा महत्त्वाचा पुरुषार्थ असून, त्याच्या साहाय्याने भौतिक व मनोविज्ञानाची पूर्णता होण्यासाठी तरुण व विद्वानांनी सामूहिक प्रयत्न करावा, एवढेच विदित करावयाचे आहे. धार्मिक माहात्म्यसिंहस्थ कुंभमेळ्याबाबत एक श्लोक प्रसिद्ध आहे :सिंह गुरुस्तया भानु: चंद्रश्चयद्रक्षयस्तया।गोदावर्याभवेत्कुंभो जायतेऽ वनिमण्डले।।सिंह राशीत गुरू आल्यास कुंभमेळा होतो. या काळात गोदावरी नदीत केलेले स्नान हे भागीरथीच्या स्नानापेक्षाही अनेक पटींनी पुण्यकारक समजले जाते. षष्टिवर्ष सहस्राणि भागीरथ्यावगाहनं सकृद् गोदावरी स्नानं सिंहस्थेच बृहस्पती।अशा शब्दांत ‘ब्रह्मवैवर्तादि’ या ग्रंथातून कुंभमेळ्याचे महात्म्य स्पष्ट केले आहे. कृतयुगातील दोन लक्ष वर्षे संपल्यानंतर मांधाता राजाच्या शककालात माघ शुक्ल दशमी तिथीला बुधवारच्या दिवशी शंकराने जटेत धारण केलेली गंगा अर्थात गोदावरी पृथ्वीवर अवतीर्ण झाली, तेव्हा गुरू हा सिंह राशीत होता. सिंहस्थाचे महत्त्व नाशिक-त्र्यंबकेश्वरीच का? त्याची कथा अशी : देव-दानवांच्या समुद्रमंथनातून निघालेला अमृतकुंभ स्वर्गात पोहोचविण्याची जबाबदारी इंद्रपुत्र जयंत याच्याकडे देण्यात आली. त्याच्या मदतीला चंद्र, सूर्य व गुरू होते. तो अमृतकुंभ मिळवण्यासाठी त्या इंद्रपुत्रावर दैत्यांनी चार वेळा हल्ला केला; मात्र देवांनी इंद्रपुत्राला मदत करून दैत्यांना पराभूत केले. त्यावेळी तो अमृतकुंभ पृथ्वीवर ज्या ज्या ठिकाणी ठेवला, त्या ठिकाणी चार अमृतबिंदू पडले. ती चार ठिकाणे : १) हरिद्वार, २) प्रयाग, ३) उज्जैन, ४) नाशिक. हरिद्वारला कुंभ राशीत गुरू, वृषभ राशीत गुरू असता प्रयागला, गुरू सिंह राशीत परंतु मेषेचा सूर्य, तुळेचा चंद्र व वैशाखी पौर्णिमा असता उज्जैन येथे, तर सिंह राशीचा गुरू असताना नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा होतोे. कुंभमेळ्याची यात्रा गोदातीर्थावर सुरू होताना गणपती पूजन, पुण्याहवाचन, नांदी श्राद्धान्त कर्म करून, सूर्य, महेश्वर, विष्णू या देवतांची प्रार्थना करून त्यांना आवाहन देऊन, पितृगणांना केवळ प्रार्थनेने आवाहन करावे. सिंहस्थ विधिशास्त्रानुसार तीर्थोपवासासहित करावा. सौभाग्य दान, धृतकुंभदान, श्रीराम-कपालेश्वर आदी देवतांना अभिषेक करावा, त्यांचे श्रद्धापूर्वक दर्शन घ्यावे. वेदमंत्र श्रवण, नामस्मरण, मंत्रजागर करावा. श्रीरामप्रभूंनी तत्कालीन सिंहस्थकाळात विधिवत स्नान, श्राद्धादिक कर्म केल्याचा उल्लेख सापडतो. नाशिक क्षेत्रात गोदातटावर श्रीरामकुंड, लक्ष्मणकुंड, सीताकुंड, अहिल्याकुंड, सूर्यकुंड, द्विमुखी हनुमान कुंड, इंद्रकुंड, मुक्तेश्वर कुंड तसेच ब्रह्मतीर्थ-शुक्लतीर्थ आहेत. ध्वजारोहणकुंभमेळ्यासाठी साधुग्राममध्ये १९ आॅगस्ट रोजी ध्वजारोहण होणार आहे. कुंभमेळ्यासाठी ध्वजारोहण हा महत्त्वाचा घटक असतो. सिंह राशीत जेव्हा गुरू गृह प्रवेश करतो, त्यावेळी सिंंहस्थ कुंभमेळ्याला प्रारंभ होतो. मात्र साधू-महंतांच्या दृष्टीने प्रत्यक्ष साधुग्राममध्ये प्रवेश केल्यानंतर ध्वजारोहण होते. ध्वजारोहणातून कुंभमेळा पर्वणीसाठी सज्ज झाल्याचा संदेश दिला जात असतो, असे मानले जात असले तरी धर्मध्वजारोहणाचे धार्मिक महत्त्व वेगळे आहे. ध्वजारोहणापासून या देवी-देवता येथे येतात आणि ध्वजावतरण होत नाही तोपर्यंत येथेच असतात. कोणत्याही पूजाविधीसाठी देवी-देवतांना आवाहन करून केलेली पूजा ही नंतर विसर्जित केली जाते. येथे मात्र देवी-देवतांना निरोप दिला जातो. शाहीस्नान हे देवी-देवतांचे असते. त्यासाठीच त्या विशिष्ट मुहूर्त तिथीला येत असतात. शाही मिरवणुकीने वाजतगाजत आखाडे त्यांना रामकुंडावर नेतात आणि तेथे त्यांचे स्नान करून प्रसाद स्वरूप म्हणून साधू-महंत स्नान करतात.असा आहे पुरोहित संघाचा धर्मध्वजश्री पंचकोटी पुरोहित महासंघाचा धर्मध्वज भगव्या रंगाचा असून, तो १५ फूट बाय साडेचार फूट (१० हस्त बाय ३ हस्त) या मापाचा असतो. या धर्मध्वजावर सिंह आणि अमृत कुंभाचे दर्शन घडते. धर्मध्वज त्रिकोणी किंवा आयताकृती असतो. यात त्रिकोण हे स्वर्ग-मृत्यू-पाताळ या त्रिलोकाचे स्वरूप आहे, तर आयत हे सिंहस्थाची प्रमुख देवता असलेल्या बृहस्पतीचे स्वरूप आहे. आत हा आकार परम पावन गोदावरी नदीच्या प्रवाहाचेही द्योतक आहे. म्हणूनच सिंहस्थ महाकुंभ पर्वकाळाच धर्मरंग हा प्रखर वैराग्याचे प्रतीक असलेला भगवा रंग आहे. जवळ असलेल्या ज्ञान, गुण, अनुभव यावर केवळ आपलाच अधिकार नसून, त्याचा सर्व समाजाला उपयोग झाला पाहिजे, हा विचार म्हणजे वैराग्य होय. तर धर्मध्वजावरील सिंंह हा शूरत्वाचे प्रतीक आहे. तसेच ते देवगुरू बृहस्पतीचे पवित्र वाहनही आहे, तर अमृतकुंभ गोदामातेचे अमरात्वाचे, मुक्तीचे प्रतीक आहे. ध्वजाला असलेले रेशमी गोंडे सामाजिक एकतेचे संघशक्तीचे प्रतीक आहे. घुंगरू आणि घंटा या अंतरनाद व ब्रह्मनादाचे प्रतीक आहेत.