सचिन राऊत, अकोला
गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील अनेक भागांत दुष्काळोच्या झळा बसत आहेत. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणा यामुळे अनेक शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करीत आहेत. तेव्हा त्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणाचा तसेच संपूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा राहतो. त्यांना आधार देण्यासाठी अकोल्यातील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने पुढाकार घेतला आहे.या महाविद्यालयाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे पदवीपर्यंतचे शिक्षण, निवास व भोजनाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला असून, त्यांना रोजगाराभिमुख शिक्षणही मोफत देण्यात येणार आहे. शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा शिक्षण, निवास आणि भोजनाचा खर्च उचलण्याचा प्रस्ताव प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपुढे ठेवला. सर्वांनीच सहमती दर्शविल्यानंतर ‘शिवाजी’ने हा उपक्रम सुरू केला आहे.या शैक्षणिक सत्रात अशा सात मुली व पाच मुलांना महाविद्यालयात प्रवेश दिला आहे. महाविद्यालयाच्या वसतिगृहात मुलींच्या निवासाची व्यवस्था करण्यात येत असून, शिक्षणाचा खर्च महाविद्यालयाने, तर भोजनाचा खर्च प्राचार्य व प्राध्यापकांनी उचलला आहे.