शेफाली परब-पंडित /मुंबईमराठी कार्ड वापरून गेली चार दशके महापालिकेवर सत्ता गाजवणाऱ्या शिवसेनेने बदलत्या काळाबरोबरच आपली दिशाही बदलली आहे. ‘करून दाखवले’ची जागा आता ‘डिड यू नो’ या जाहिरातबाजीतून अमराठी भाषिकांपर्यंत पोहोचण्याची धावपळ सेनेत सुरू झाली आहे. त्याच वेळी भाजपाने अरबी समुद्रात शिवस्मारक व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा प्रस्ताव मार्गी लावून मराठी मतांना लक्ष्य केले आहे. तर मनसेची पाटी कोरीच राहिल्यामुळे मुंबईतील मराठी माणूस संभ्रमात असून महापालिका निवडणुकीत मराठी मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन होण्याची चिन्हे आहेत.मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेनेची स्थापना झाली. मराठी माणूस, त्याचा हक्क यावरच शिवसेनेचे राजकारण फिरत राहिले. मराठी कुटुंबातील मुलेच शिवसेनेच्या या चळवळीत उतरली. शाखाप्रमुख या संकल्पनेमुळे कानाकोपऱ्यातील मराठी माणसापर्यंत शिवसेना पोहोचली. त्यामुळे मुंबईतील मराठी टक्का हा शिवसेनेच्या हक्काचा होऊन गेला. अन्य राजकीय पक्षांना शिवसेनेच्या या व्होट बँकेचा विचार करण्याचीही संधी मिळाली नाही. परंतु मराठी बाण्यावरच मनसेची स्थापना झाली आणि मराठी मातांना पर्याय मिळाला. २०१२ च्या निवडणुकीत हा मराठी टक्का मोठ्या प्रमाणात मनसेच्या बाजूने वळला आणि आता होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी सर्वच राजकीय पक्षांनी मराठी मते खेचण्यासाठी विविध खेळ्या खेळल्या आहेत. त्यामुळे मराठी मते विभाजित होण्याची शक्यता असून, कोणाकडे अधिक मराठी मते फिरतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.मराठी मतांसाठी भाजपाची खेळीच्मुंबईतील मराठी टक्का घसरला असला तरी आजही मराठी मते निर्णायक ठरतात, याची जाणीव भाजपाला असल्याने मिशन शंभर गाठण्यासाठी ही मते आपल्या बाजूने वळवण्यासाठी भाजपानेही प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात उभारण्याचा प्रकल्प भाजपाने हायजॅक केला. च्या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: मुंबईत आले होते. तसेच शिवसैनिकांचे व मुंबईत मराठी भाषिकांसाठी आजही आदर्श असलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात उभारण्याच्या प्रस्तावाला झटपट मार्गी लावून मराठी मने जिंकली आहेत. यामुळे मराठी मते भाजपाकडे वळण्याची शक्यता आहे.असे होईल मराठी मतांचे विभाजनमनसेने २०१२ मध्ये मराठी माणसाचा विश्वास कमावल्याने मनसेचे २८ नगरसेवक निवडून आले होते. मात्र मनसेची पाटी गेली पाच वर्षे कोरीच राहिली, तर मनसेतील अनेक नेते स्वगृही म्हणजेच शिवसेनेत परतले. या वेळेस संभाजी ब्रिगेडनेही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. यामुळे शिवसेना-मनसेबरोबरच भाजपा आणि संभाजी ब्रिगेड अशा अन्य पर्यायांमध्ये मराठी मतांचे विभाजन होईल आणि हेच भाजपाला हवे आहे, असे भाजपाच्या गोटातून सांगण्यात आले. हे मराठी विभाग ठरणार निर्णायकच्मुंबईत २६ टक्के मराठी मते आहेत. पूर्व उपनगरात भांडुप, विक्रोळी, मुलुंड पूर्व, घाटकोपर, दक्षिण मध्य मुंबईत लालबाग, परळ, वरळी, वडाळा, शिवडी, करी रोड, चिंचपोकळी, दादर तर शहर भागात गिरगाव, भायखळा, पश्चिम उपनगरात विलेपार्ले, गोरेगाव या ठिकाणी मराठी टक्का उरला आहे.
२००२ मध्ये ९८ जागांवर निवडून आलेल्या शिवसेनेला २०१२ मध्ये अवघ्या ७५ जागांवर समाधान मानावे लागले. त्यात मित्रपक्ष भाजपानेही स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे महापालिकेवर पुन्हा सत्ता हवी असल्यास अमराठी मतांना आकर्षित करणे शिवसेनेनेला भाग आहे, याचा साक्षात्कार झाल्याने अमराठी भाषिकांसाठी उपक्रम राबविण्यास शिवसेनेने सुरुवात केली. गुजराती बहुल भागात आपल्या विकासकामांचे फलक गुजराती भाषेत व उर्दू भाषेतील दिनदर्शिका छापून शिवसेनेने आपला इरादा स्पष्ट केला आहे.