- जमीर काझी, मुंबई
मुंबई, पुण्यानंतर महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत पोलीस वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. विद्यमान आयुक्त प्रभात रंजन महासंचालकाच्या बढतीसाठी पंधरवड्यापूर्वीच पात्र ठरले असताना त्या जागेचा उत्तराधिकारी निश्चित होत नसल्याने बढती रखडली आहे. त्याचबरोबर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) महासंचालक, राज्य गुप्त वार्ता विभागाचे (एसआयडी) आयुक्त या महत्त्वाच्या पदांवर अद्याप पूर्णवेळ नियुक्त्या झालेल्या नाहीत.त्यामुळे आघाडी सरकारच्या काळात गृह विभागाच्या सुस्ताईबाबत टीका करणारे भाजपा-युती सरकारचा कारभार आता त्याचपद्धतीने सुरु आहे. पूर्वी नियुक्तीसाठी ‘बारामती’ला नवस करावा लागत होता, आता नागपूरातील मठात ‘फिल्डिंग’ लावावी लागते, एवढाच फरक झाल्याची प्रतिक्रिया पोलीस वर्तुळातून होत आहे. नवी मुंबईच्या आयुक्तपदासाठी एसीबीचे अपर महासंचालक संजय बर्वे, एटीएसचे प्रमुख विवेक फणसाळकर, नागपूरचे आयुक्त एसपीएस यादव, क्राईम ब्रँचचे अतुल कुलकर्णी यांच्या नावामध्ये चढओढ सुरु आहे.गेल्यावर्षी ३१ डिसेंबरला अतुलचंद्र कुलकर्णी यांची पदोन्नती झाली मात्र चार महिने होउनही अन्यत्र नियुक्ती करण्यात आलेली नाही. २९ फेबु्रवारीला एसीबीचे महासंचालक विजय कांबळे सेवानिवृत्त झाले. तर ३१ मार्चला एसआयडीच्या रश्मी शुक्ला यांची पुण्याच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या जागी अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. या विलंबामागील नेमकी कारणे काय, असा सवाल अधिकाऱ्यांतून विचारला जात आहे. गतीमान कारभाराची ग्वाही देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृह खात्याची धुरा असताना याबाबत होणाऱ्या दुर्लक्षाकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पोलीस महासंचालकानंतर दुसऱ्या दर्जाचे मानले जाणाऱ्या ‘एसीबी’च्या प्रमुुखपदी गेल्या दीड महिन्यांपासून पूर्णवेळ अधिकारी नाही. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रमाणचे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा सहभाग असलेल्या जलसंपदा विभागाच्या गैरव्यवहारचा तपास या विभागाकडून केला जात आहे. त्यामुळे याठिकाणी जबाबदार प्रमुख असण्याची नितांत गरज आहे. पण त्याचा पदभार अपर महासंचालक संजय बर्वे यांच्याकडे आहे. वास्तविक त्यांचे नाव मुंबईच्या आयुक्तपदासाठी चर्चेत होते. मात्र आदर्श सोसायटीच्या गैरव्यवहारप्रकरणी त्यांचे नाव असल्याने ते मागे पडले. त्याची भरपाई म्हणून एसीबीचा अतिरिक्त पदभार त्यांच्याकडे सोपविण्यात आला. विभागातील अपर महासंचालकाचे दुसरे पद रिक्त असल्याने त्याचीही धुरा त्यांच्याकडे आहे. बर्वे यांची नवी मुुंबईच्या आयुक्तपदासाठी निवड न झाल्यास आणखी काहीकाळ तेच विभागाचे प्रभारी राहतील, असे गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. एसीबीच्या प्रमुखपदी ज्येष्ठतेनुसार पोलीस गृहनिर्माण विभागाचे महासंचालक सतीश माथूर किंवा ‘होमगार्ड’चे प्रमुख राकेश मारिया यापैकी एकाची निवड होणे आवश्यक आहे. संजय वर्मा यांचे जोरदार प्रयत्न ‘एडीजी’ची पदे रिक्त असून त्यासाठी अव्वल स्थानावर असलेल्या कोल्हापूरचे आयजी संजय वर्मा यांनीही पदोन्नतीवर नवी मुंबईच्या आयुक्तपदासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. मात्र त्यांच्या कार्यपद्धतीबाबत मुख्यमंत्री, गृहसचिव व डीजीकडे अनेक तक्रारी आल्या आहेत.तक्रारदारामध्ये आयपीएस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. परंतु, मुख्यमंत्री कार्यालयातील अतिवरिष्ठ अधिकारी त्यांचा जवळचा नातेवाईक असल्याने तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे सांगितले जाते.नवी मुंबईची धुरा दिल्यास अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांमधून उघडपणे असंतोष निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यांचे नाव मागे पडल्याचे सांगितले जाते.मीरा बोरवणकर ‘रिलीव्ह’च्या प्रतीक्षेत‘लीगल व टेक्निकल’च्या महासंचालक मीरा बोरवणकर-चढ्ढा यांची केंद्रात बीपीआरअॅण्ड डी प्रमुखपदी प्रतिनियुक्ती झाली आहे. डीजीचे आणखी एक पद रिक्त होणार आहे. आस्थापना विभागाचे अप्पर महासंचालक व्ही.डी.मिश्रा यांची बढती होईल. मात्र अन्य नेमणूका न झाल्याने राज्य सरकारने बोरवणकर यांना अद्याप ‘रिलिव्ह’ केलेले नाही. एसीबी, एसआयडी आयुक्तपदाची नियुक्ती का प्रलंबित आहे हे सांगू शकत नाही. मात्र त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.-के. पी. बक्षी, अप्पर मुख्य सचिव, गृह