बावडा : श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज पालखीतील पादुकांना आज सराटी (ता. इंदापूर) येथील नीरा नदीमध्ये अखेर टँकरच्या पाण्यानेच स्नान घालावे लागले.शनिवारी (दि. ९) रात्री पालखी मुक्कामासाठी सराटी गावात विसावली. या वेळी रात्री या ठिकाणी कीर्तन, भारूड अशा कार्यक्रमाने सराटीला प्रतिपंढरीचे स्वरूप आले होते. बावडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कपिल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहायक ईश्वर कट्टी, पी. व्ही. गायकवाड, श्रीमती मुलाणी, औषधनिर्माण अधिकारी रमाकांत म्हसवडकर, प्रदीप पवार आदींनी वैद्यकीय सेवा व्यवस्थितरीत्या पुरवली. सकाळी सात वाजता तुतारीच्या निनादात व हरिनामाचा जागर करीत पादुका नीरा नदीमध्ये स्नानासाठी नेण्यात आल्या. त्या ठिकाणी टँकरच्या पाण्याने स्नान घालण्यात आले. त्यानंतर पुष्पहार अर्पण करून आरती घेण्यात आली. या वेळी असंख्य भाविकांनी पादुकास्नानाचा सोहळा टिपला. त्यानंतर पालखी पूर्ववत विश्रांती ठिकाणी ठेवण्यात आली. गावकऱ्यांनी विधिवत पूजा केली. त्यानंतर पालखीने पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम आटोपून अकलूजकडे सोलापूर जिल्ह्यात प्रयाण केले. पुण्य उभे राहो आता, संताचे या कारणे ।पंढरीचे लागा वाटे सखा भेटे विठ्ठल ॥विठुरायाच्या ओढीने व पंढरपूर जवळ आल्याने वारकऱ्यांचा उत्साह द्विगुणित होत होता. ‘ग्यानबा तुकाराम’चा गजर करीत आनंदाने वैष्णव मार्गस्थ झाले. जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांच्यासह नागरिकांनी निरोप दिला. या वेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलतराव देसाई, जिल्हा आरोग्य अधीक्षक संजीवकुमार जाधव, अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक निळकंठ राठोड, गटविकास अधिकारी लहू वडापुरे आदी उपस्थित होते. पालखी पुणे-सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरून नीरा नदीवरील पुलावरून मार्गस्थ झाली.पालखीने रविवारी (दि. १०) पुणे जिल्ह्यातील प्रवास संपवून सोलापूर जिल्ह्याकडे प्रवेश केला. या वेळी पलीकडील बाजूस पालखीचे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, आमदार हनुमंत डोळस आदींनी स्वागत केले. २७ जूनपासून आजपर्यंत पोलीस बंदोबस्तात असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच आरोग्य विभागाने आपली जबाबदारी व्यवस्थितरीत्या पार पाडली. तसेच या काळात पालखीचा सहवास लाभल्याने आनंदी वातावरणात आज परतीचा प्रवास केला.(वार्ताहर)
पादुकांना टँकरच्याच पाण्याने स्नान
By admin | Published: July 11, 2016 12:28 AM