नवी मुंबई : महापालिकेने १२ वर्षांपूर्वी गोठीवलीमध्ये शाळेची इमारत बांधली. शाळा प्रत्यक्ष सुरूही केली, पण तेथे शौचालय नसल्याने विद्यार्थ्यांची विशेषत: विद्यार्थिनींची गैरसोय व्हायची. नगरसेविका मंदकिनी म्हात्रे यांनी पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने प्रसाधनगृह बांधले आहे. नवी मुंबई महानगरपालिका प्रत्येक वर्षी प्रसाधनगृह उभारण्यावर व देखभाल करण्यासाठी करोडो रूपये खर्च करते. पण जिथे गरज आहे तिथे प्रसाधनगृह उभारले जात नसल्याने सर्व पैसा व्यर्थ जावू लागला होता. गोठीवलीत १२ वर्षांपूर्वी शाळेचे बांधकाम करण्यात आले. इमारतीच्या मूळ प्रस्तावामध्ये मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह प्रस्तावित केले होते. प्रत्यक्षात बांधकाम करताना अनेक अडथळे आणल्याने ते काम राहिले. शाळा प्रत्यक्ष सुरू केल्यानंतर येथील मुलांना समोरील दुसऱ्या इमारतीमध्ये जावे लागत होते. २८ आॅक्टोबर २०१५ रोजी महिला हक्क समितीने नवी मुंबई पालिकेस भेट दिली. आमदार मनीषा चौधरी, मंदा म्हात्रे, भारती लव्हेकर उपस्थित होत्या. या समितीपुढे नगरसेविका मंदाकिनी रमाकांत म्हात्रे यांनी मुलींसाठी शाळेत प्रसाधनगृह नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते. या कामामध्ये अडथळे आणले जात असल्याचेही सांगितले होते. यामुळे आमदारांच्या समितीने प्रशासनाला धारेवर धरले होते. नगरसेविकेच्या पाठपुराव्यानंतर प्रसाधनगृहाचे बांधकाम सुरू करण्यात आले. नुकतेच स्वच्छतागृह मुलांसाठी खुले करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रदेश काँगे्रस कमिटीचे सरचिटणीस रमाकांत म्हात्रे, युवक काँगे्रसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे, जयराम म्हात्रे, मेघनाथ पाटील, सुधाकर म्हात्रे, नितीन म्हात्रे, संजय पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षक उपस्थित होते.
शाळेत १२ वर्षांनंतर बांधले प्रसाधनगृह
By admin | Published: April 04, 2017 3:37 AM