मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील राज्यमार्ग आणि प्रमुख मार्गांलगत दर १०० किलोमीटरनंतर महिला प्रवाशांसाठी प्रसाधनगृह आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी जनसुविधा केंद्र उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने बुधवारी घेतला. दोन मोठ्या शहरांदरम्यान आणि गावाबाहेर रस्त्यालगत या दोन्हींची उभारणी करण्यात येणार आहे. सरकारच्या जागांचा वापर त्यासाठी करण्यात येईल आणि खासगी व्यक्ती वा संस्थेच्या खर्चाने उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात येतील. या केंद्राची देखभाल, दुरुस्ती, प्रवाशांची सुरक्षितता तसेच तत्सम जबाबदारी त्या खासगी व्यक्ती वा संस्थांची राहील. टप्प्याटप्प्याने अशी ४०० प्रसाधनगृहे बांधण्यात येणार आहेत. जनसुविधा केंद्रांमध्ये उपहारगृह, दूरध्वनी सुविधा, इंटरनेट, खासगी वाहनतळ, सार्वजनिक प्रसाधनगृह आदी सुविधा असतील. राज्यातील प्रमुख मार्गावर मैलोगणती प्रसाधनगृहच नाहीत. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यासाठी हे चित्र चांगले नव्हते. अनेकदा महिला संघटनांनी त्यासाठी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यंदाचा अर्थसंकल्प मांडताना महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधण्याची आणि त्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा केली होती. (विशेष प्रतिनिधी)
प्रत्येक १०० कि.मी.नंतर महिलांसाठी प्रसाधनगृह
By admin | Published: June 23, 2016 4:44 AM