ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २६ : रात्रशाळा बंद करण्याचा सरकारचा डाव हाणून पाडण्यासाठी रात्रशाळांमधील आजी-माजी वि़द्यार्थी आणि शिक्षक यांचा येत्या १ ऑगस्टला मंत्रालयावर 'बॅटरी मोर्चा' निघणार आहे. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथिचे औच्युतै साधत या मोर्चाची सुरवात लोकमान्य टिळकांच्या गिरगाव चौपाटीवरील पुतळ्याला अभिवादन करुन सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. असे छात्र भारतीचे मुंबई अध्यक्ष सागर भालेराव यांनी लोकमतला बोलताना सांगितले. रात्रशाळांना मुक्त शाळेंचा पर्याय देण्याची योजना शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केली आहे. त्याला या कष्टकरी वि़द्यार्थ्यांचा विरोध आहे. दिवसांच्या शाळांचे संचमान्यतेचे निकष रात्रशाळा आणि रात्र ज्युनिअर कॉलेजांना लावल्यामुळे शिक्षक मोठ्या संख्येने सरप्लस झाले आहेत. महत्वाच्या विषयांना शिक्षकच उरलेले नाहीत. असे शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष जयवंत पाटील यांनी सांगीतले. पुढे बोलताना ते म्हणाले, मंत्रालयावरील 'बॅटरी मोर्चा'च्या वेळी रात्र प्रशाला मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष अरुण खाडिलकर, आमदार कपिल पाटील, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, मोर्च्याचं नेतृत्व करणार आहेत. मुक्त शाळांचा पर्याय म्हणजे रात्रशाळेत आणि नाईट ज्युनिअर कॉलेजात जाऊन शिकण्याचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न आहे. दरम्यान, ३० वर्षांपूर्वी तत्कालीन सरकारने रात्रशाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा असाच आझाद मैदानावर पहिला बॅटरी मोर्चा निघाला होता. येत्या सोमवारी १ ऑगस्टला शिक्षणाच्या स्वराज्यासाठी टिळक पुतळ्यापासून हा मोर्चा निघणार आहे. अधिकाअधिक विद्यार्थांनी यामध्ये सहभाग घ्यावा, सर्वांना सोबत घेऊन या! असे आव्हान छात्र भारतीचे मुंबई अध्यक्ष सागर भालेराव यांनी केले आहे.
१ ऑगस्टला रात्रशाळांचा मंत्रालयावर 'बॅटरी मोर्चा'
By admin | Published: July 26, 2016 8:21 PM