उल्हासनगर : शहराच्या पूर्व भागात दुपारी चारनंतर वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल झाले. अंधारामुळे गणेशभक्तांनी नाराजी व्यक्त केली. फिडर ब्रेकडाऊन झाल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती उपकार्यकरी अभियंत्यांनी दिली. रात्री ९ नंतर वीज पुरवठा पूर्ववत होईल असे सांगितले जात होते. मात्र वीज आली नव्हती असे नागरिकांनी सांगितले. गणपती बघण्यासाठी बाहेर पडलेल्या भक्तांनी याचा चांगलाच फटका बसला.
उल्हासनगरात वीज जाण्याच्या प्रमाणात मागील काही दिवसांपासून वाढ झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दुपारी चारनंतर खंडित झालेला वीजपुरवठा सायंकाळी ६ नंतरही नियमित झाला नसल्याने नागरिकांसह गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांनी मोर्यानगरी येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाºया मंडळाच्या कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतल्यावर थेट फिडर ब्रेकडाऊन झाल्याने वीज पुरवठा खंडित झाल्याचे सांगण्यात आले.
ऐन गणेशोत्सवा दरम्यान तब्बल ५ तास पेक्षा जास्तवेळ वीजपुरवठा खंडित झाल्याने गणेशभक्तांनी नाराजी व्यक्त केली. तसेच संततधार पाऊस सुरू असल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांची दमछाक झाल्याचे चित्र दिसत होते. वीज पुरवठा खंडित झाल्याचा फटका पूर्वेतील ४ लाख ग्राहकांना बसला. घरी गणपती असल्याने त्यातच अंधाराचे साम्राज्य पसरल्यामुळे महावितरणच्या भोंगळ कारभारावर ग्राहकांनी तोंडसुख घेतले. बिले पाठवता येतात, मग देखभाल का केली जात नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला.