कुरुलमध्ये सभापतींच्या प्रतिष्ठेची लढाईमहेश कुलकर्णी - आॅनलाईन लोकमत कुरुलराष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या कुरुल जिल्हा परिषद गट व गणात यावेळी भीमा परिसर विकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारल्याने जोरदार चुरस निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी, भीमा परिसर विकास आघाडी व काँग्रेस अशी तिरंगी लढत होत असली तरी खरी लढत ही भीमा आघाडीच्या शैला गोडसे व राष्ट्रवादीच्या उमेदवार अंबिका पाटील यांच्यामध्येच होणार आहे.कुरुल जि. प. गटातून गेल्यावेळी जालिंदर लांडे हे निवडून आले होते. यावेळी हा गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने राष्ट्रवादीसह सर्वच प्रमुख पक्षातील नेत्यांची गोची झाली आहे. त्यामुळे गेल्यावेळी कुरुल गणातून निवडून गेलेल्या पं.स.च्या सभापती अंबिका पाटील यांना जि.प.ची उमेदवारी विनासायास मिळाली. दुसरीकडे भीमा आघाडीतून गेल्या पाच महिन्यांपासून कुरुल गटासाठी शैला गोडसे यांनी जोरदार मोर्चेबांधणी केल्याने अखेर अनेक अडथळ्यांची शर्यत पार करुन त्यांनी आघाडीची उमेदवारी मिळविण्यात बाजी मारली. त्यामुळे आंबेचिंचोलीच्या सरपंच असलेल्या व दोनवेळा पदवीधर मतदासंघाची निवडणूक लढविलेल्या शैला गोडसे व पं.स.च्या सभापती असलेल्या अंबिका पाटील यांच्यामधला सामना रंगणार आहे.कुरुल गणातून राष्ट्रवादीकडून विद्यमान जि.प.सदस्य जालिंदर लांडे हे उभारले आहेत. तर त्यांच्याविरुद्ध भीमा परिसर आघाडीकडून माजी उपसरपंच चंद्रसेन जाधव, भाजपकडून लिंगदेव निकम तर काँग्रेसकडून दत्तात्रय जाधव हे उमेदवार आहेत. लांडे यांच्यासह चारही उमेदवार कुरुल गावातीलच असल्याने आता खरी कसोटी लागणार आहे ती मतदारांची. यावेळी भीमा आघाडीला राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांना मानणाऱ्यांची साथ आहे. तसेच भाजपच्या माध्यमातून लिंगदेव निकम या माजी सैनिकाने लांडे यांच्याविरुद्ध शड्डू ठोकला आहे तर काँग्रेसकडून दत्तात्रय जाधव हे आपले नशीब आजमावत आहेत.-----------------------कौल कुणालासर्वच उमेदवारांनी सोशल मीडिया, बॅनर आदीसह वाड्या -वस्त्यांवर अनेकवेळा जाऊन मतदारांच्या गाठी-भेटी घेतल्या असल्या तरी या निवडणुकीत मतदारांचा कौल नेमका कोणाला मिळणार हे निकालानंतर स्पष्ट होईल.
कुरुलमध्ये सभापतींच्या प्रतिष्ठेची लढाई
By admin | Published: February 18, 2017 3:19 PM