मुंबई : रोहित वेमुलाची आई आणि भावाच्या धर्मांतरानंतर आता श्रेयवादाची रस्सीखेच सुरू झाली आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकरांनी रोहित वेमुलाची आई आणि भावाला मुंबईत आणून बौद्ध धर्माची दीक्षा दिली. मात्र, आता खासदार रामदास आठवले आणि अन्य रिपब्लिकन नेत्यांना भेटण्यास वेमुला कुटुंबीयांना मनाई करण्यात आली आहे. शुक्रवारी रोहितची आई आणि भाऊ खा. रामदास आठवले यांना भेटणार होते. त्यानंतर अधिकृत पत्रकार परिषदेचे निरोपही आठवलेंकडून माध्यमांकडे पाठविण्यात आले होते. मात्र वेमुला परिवाराने अशा गाठीभेटी घेऊ नये यासाठी प्रकाश आंबेडकरांनी प्रयत्न केल्याचा दावा रामदास आठवले यांनी केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५व्या जयंती दिनी वेमुला परिवाराने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यांचे स्वागत करावे म्हणून आम्ही त्यांना बोलाविले होते. अथवा मी स्वत: जाऊन त्यांना भेटलो असतो. मात्र काही राजकीय पक्षांनी या भेटीला विरोध करत राजकारण केल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आहोत याचा अर्थ आम्ही भाजपाचे गुलाम नाही. मी एनडीएसोबत असलो तरी रोहितला न्याय मिळवून देण्यासाठी लढा देणार आहे. रोहितच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करायची आपली इच्छा आहे. त्यांची भेट झाली तर आम्ही आमच्या पक्षाकडून २ लाखांची मदत करणार आहोत. समाज म्हणून आम्ही रोहितच्या कुटुंबीयांसोबत आहोत. रोहितच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांची चौकशी व्हावी तसेच हैदराबाद विद्यापीठाच्या कुलगुरूंची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणीही आठवले यांनी केली. (प्रतिनिधी)शासनाकडे पाठपुरावा करणारवेमुला परिवाराला न्याय मिळावा यासाठी मी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. प्रकाश आंबेडकरांना श्रेय जाईल असे वाटले असेल. परंतु रोहितच्या घरच्यांनी स्वतंत्र निर्णय घ्यायला हवा होता. मी रिपब्लिकन ऐक्यासाठी तयार आहे. प्रकाश आंबेडकरांना नेतृत्व करायचे असेल तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायला मी तयार आहे.
धर्मांतरावरून श्रेयवादाची लढाई
By admin | Published: April 16, 2016 2:39 AM