ही लढाई अस्तित्वाची आहे, अन्यथा हुकूमशाही प्रवृत्ती फोफावतील!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 05:43 AM2019-02-24T05:43:41+5:302019-02-24T05:44:16+5:30
पृथ्वीराज चव्हाण । मतभेद दूर करावेच लागतील
- अतुल कुलकर्णी
मुंबई : काँग्रेस व राष्ट्रवादीत कटुता कधीच नव्हती, पण दोघांचे परंपरागत दृष्टिकोन वेगळे होते. त्यातून मतभेद व्हायचे. मात्र, आमच्या पराभवाने ग्रामीण भागातील नेतृत्वाचे व सहकारी चळवळीचे खच्चीकरण झाले. आताची लढाई व्यक्तींविरोधात धर्मनिरपेक्ष शक्तींच्या अस्तित्वासाठीची आहे. ती एकत्रित न लढल्यास हिंदुत्वाच्या नावाखाली भाजपा हुकूमशाहीचे राजकारण व अराजकता निर्माण करेल, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
भाजपा शिवसेनेची युती झाली. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत राजकीय गणिते बदलतील, का? या प्रश्नावर ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी गेली चार वर्षे भाजपाकडून एवढा अपमान स्वीकारून युती केली. मन मारून त्यांना अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बसावे लागले. हे का केले, ते कार्यकर्त्यांना पटवून देणे त्यांना अशक्य आहे. दोघांच्याही कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड दरी निर्माण झाली आहे. जे लोक कालपर्यंत एकमेकांना दंड थोपटून दाखवित होते, ते आज लगेच एकत्र येतील, असे समजणे चुकीचे आहे.
भाजपाविषयी ते म्हणाले की, हिंदुत्ववादी विचारांची राज्यात एकापेक्षा जास्त संघटना असू नयेत, अशीच भाजपाची धारणा आहे. म्हणूनच त्यांनी शिवसेनेला संपविण्याची भाषा सुरू केली. परिणामी, उद्धव ठाकरे यांनीही टोकाची भूमिका घेतली. आज देशात विरोधकांच्या महाआघाडीचे वारे जोरात वाहत आहे. उत्तर प्रदेशात आपण पराभूत होणार, हे भाजपाच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच तर भाजपाने मजबुरीतून शिवसेनेला सोबत घेतले आहे, पण घेताना शिवसेनेचे नुकसान कसे होईल याचेही डाव भाजपा खेळली आहेत. प्रत्येक निवडणूक पैशाने जिंकायची, अशी भाजपाची वृत्ती आहे. आम्ही ते करु शकत नाही.
काँग्रेस आणि राष्टÑवादीतही आलबेल नाही, कुरबुरी आहेत, याकडे लक्ष वेधता पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आम्ही ४८ पैकी प्रत्येकी २० जागा वाटून घेतल्या आहेत. काही जागा मित्रपक्षाशी चर्चा करून ठरवू. भाजपाचे हुकूमशाही सरकार घालवायचे असेल तर आम्हाला अंतर्गत मतभेद दूर करावे लागतील. राष्टÑवादीला औरंगाबाद हवे आहे, आम्हाला अहमदनगर पाहिजे, सांगली, पुण्यातून कोण उभे राहायचे याची चर्चा चालू आहेच. पण स्थानिक कुरबुरी दूर सारून आम्हाला ही निवडणूक एकत्रितपणे लढावी लागेल. पूर्वी इंदिरा गांधी असताना काँग्रेसच्या हात या चिन्हावर लोक शिक्का मारायचे. आज परिस्थिती वेगळी आहे. मधल्या काही वर्षांमध्ये राजकीय पक्षांचे महत्त्व कमी होत गेले आणि नेते मोठे होत गेले. माझ्याकडे पैसा आहे, ताकद आहे, मग मी निवडून येऊ शकतो, असे म्हणणारे लोक वाढले, अशा लोकांनी अनेक पक्षांना वेठीला धरले. त्यातून पक्ष दुबळे होत गेले. भाजपानेही हेच केले. अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आरएसएसचे वर्चस्व नको आहे. त्यातून त्यांनी तुल्यबळ चेहरे पुढे करणे सुरू केले. याचा फटका त्यांनाही बसणार आहे.
मुंबई काँग्रेसमधील वादाविषयी ते म्हणाले की, घर म्हटले की वाद होतातच. पण पक्षाचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे त्यात लक्ष घालतील आणि मुंबई अध्यक्ष निवडणुकीला उभे राहिल्यास त्या काळात कार्याध्यक्ष म्हणून अन्य कोणाला तरी जबाबदारी दिली जाईल.
पूर्वी आम्ही जसे होतो, तशी आता भाजपाची अवस्था झाली आहे. स्वपक्षाच्या कार्यकर्त्यांना दूर सारून आमच्याकडून आयात केलेल्यांच्या मागे भाजपा पैशाची ताकद लावून त्यांना विजयी करताना दिसली आहे. त्यातून भाजपाने आरएसएसच्या कार्यकर्त्यांवरही अन्याय चालविला आहे.
प्रकाश आंबेडकरांविषयी ते म्हणाले...
मला त्यांची भूमिका प्रामाणिकपणाची वाटत नाही. त्यांनी मतविभाजनाचा विडाच उचलेला आहे. सत्ताधारी भाजपाच्या फायद्याची खेळी ते खेळत आहेत. म्हणून तर मुंबईतील शिवाजी पार्कवर त्यांच्या व ओवेसींच्या सभेसाठी परवानगी दिली जाते आणि राहुल गांधी यांच्या सभेसाठी ती नाकारली जाते. यातच सगळे काही आले.