मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या प्रभागांच्या फेररचनेमुळे सर्वच प्रस्थापितांना हादरे बसले. काही वॉर्डमधील प्रभागांचे विस्तारीकरण झाले, तर काही प्रभागांचे दोन प्रभागांत विभाजन झाले. कुर्ला पश्चिम एल वॉर्डातील प्रभाग क्रमांक १६२ मध्ये हीच अवस्था आहे. या प्रभागात विजयासाठी पाच ते सहा हजार मतांची आवश्यकता असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. परिणामी प्रभागात सहा हजारी मनसबदारीसाठी लढाई रंगणार आहे.कुर्ला पश्चिमेतील नागरिकांना वाहतूककोंडीची समस्या नवीन नाही. यामुळे याची सवय झाल्याचे स्थानिक सांगतात. शिवाय झोपडपट्टी जास्त प्रमाणात असल्याने परिसराचा विकासदेखील शून्य आहे. अशा परिस्थितीत फेररचनेमुळे प्रभाग लहान झाला आहे. परिणामी यंदाच्या निवडणुकीत हा प्रश्न चर्चिला जाणार यात शंका नाही. फेररचनेनुसार प्रभागाच्या आकडेवारीवर नजर टाकली असता सध्या सुमारे २८ हजार ५०० लोकसंख्या आहे. यापैकी सुमारे ५० टक्के मतदान करणार आहेत. यातून विजयासाठी पाच ते सहा हजार मतांची आवश्यकता असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. यामुळे पाच ते सहा हजार मतांसाठी एका विशिष्ट नगरात आपले वर्चस्व निर्माण करून विजय सहज शक्य आहे.प्रभागात निम्न मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीयांसह हिंदू, मुस्लीम लोकवस्ती आहे. प्रभागातील सत्ताधारी पक्षातील नेत्याचा विचार करता हा पल्ला पार करणे सहज शक्य आहे. मात्र मताचा विजयी आकडा कमी असल्याने उमेदवार गाफील राहिल्यास निकाल पालटेल, असा अंदाज स्थानिक विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)
मनसबदारांची लढाई
By admin | Published: January 20, 2017 2:11 AM