जयसिंगपूर : ऊस तोडणी वाहतुकीच्या चौदा टक्के वाढीप्रमाणे शेतकऱ्यांचा वाढलेला उत्पादन खर्च गृहित धरुन एफआरपीच्या चौदा टक्के प्रमाणे होणारी सरासरी दोनशे रुपये शेतकऱ्यांना मिळावेत, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना संघर्ष करणार असल्याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी येथे झालेल्या आॅनलाईन ऊस परिषदेत केली.जयसिंगपूर-उदगांव मार्गावरील कल्पवृक्ष गार्डनमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १९ वी ऊस परिषद आॅनलाईन पध्दतीने झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करुन परिषदेचे नियोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी माजी जि. प. सदस्य जयकुमार कोले होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन परिषदेस सुरुवात झाली. यावेळी राज्यातील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कोरोनामुळे मृत्यु झालेल्या तर अतिवृष्टीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.गेली तीन वर्षे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत असल्याचे सांगून राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या एफआरपीतून चौदा टक्के तोडणी वाहतुक वजा केली जाणार आहे. तोडणी वाहतुकीप्रमाणेच एफआरपीमध्ये देखील चौदा टक्के वाढ करावी. साडेबारा टक्के रिकव्हरीचा विचार केल्यास तयार होणारी साखर व उपपदार्थातून मिळणारी रक्कम याचा विचार केल्यास ४५११ रुपये इतकी रक्कम होते.
यातून तोडणी खर्च, प्रक्रिया खर्च, वाढलेली एफआरपी, शिवाय व्याजाचे ८० रुपये वजा केल्यास २९१२ इतकी एफआरपी व चौदा टक्के वाढीप्रमाणे सरासरी दोनशे रुपये ऊस उत्पादक शेतकºयांना हंगाम संपल्यानंतर कारखानदारांनी द्यावेत. यात एक रुपयाही कमी घेतला जाणार नाही. त्यासाठी गोडावूनमधून साखरेची वाहतुक होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. स्वागत तालुकाध्यक्ष शैलेश आडके तर प्रदेश उपाध्यक्ष प्रा. विठ्ठल मोरे यांनी प्रास्ताविक केले.