ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 16 - गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) घोटाळेबहाद्दर त्रिकुटाला अटक करण्यात आल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून या समितीकडे जीसीएचा कारभार देण्यात येणार आहे. जीसीएचे अध्यक्ष चेतन देसाई, सचिव विनोद ऊर्फ बाळू फडके व खजिनदार अकबर मुल्ला यांना आर्थिक गुन्हे विभागाने 3.13 कोटी रुपयांची अफरातफर प्रकरणात बुधवारी अटक केली होती.या धरपकडीनंतर जीसीएचा कारभार व्यवस्थित चालावा, यासाठी बीसीसीआयने खबरदारी घेतली आहे. असोसिएशनचा कारभार चालविण्यासाठी समिती नियुक्त करण्यात येणार असल्याचे बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांनी जाहीर केले आहे. क्रिकेट व क्रिकेटपटूंच्या हिताची काळजी घेण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल. क्रिकेट व क्रिकेटपटूंचे नुकसान होऊ देणार नाही, असे शिर्के यांनी माध्यमांना सांगितले.जीसीएच्या घोटाळे आणि इतर वादानंतर जीसीएचे बीसीसीआयमधील सदस्यत्व रद्द करण्याची शक्यता शिर्के यांनी फेटाळली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे तूर्त असा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
त्रिकुटाला एक दिवस कोठडी
जीसीएच्या बुधवारी अटक करण्यात आलेल्या तिन्ही पदाधिका:यांना पोलिसांनी गुरुवारी पणजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून एक दिवसाची पोलीस कोठडी मिळविली. संशयितांना न्यायदानाच्या ठिकाणी उपस्थित न करता त्यांना न्यायाधीशांच्या कचेरीत उपस्थित करण्यात आले. तेथून मुल्ला यांना गोमेकॉत, तर चेतन व बाळू यांना पणजी पोलिसांच्या कोठडीत नेण्यात आले. पोलिसांना हवी इतिवृत्ताची वहीजीसीएच्या इतिवृत्ताची वही पोलिसांना हवी असून ती मिळविण्यासाठी तिन्ही संशयितांची कोठडीतील चौकशी महत्त्वाची आहे, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. या वहीची माहिती संशयित देत नसल्याचा दावा त्यांनी केला. इतिवृत्ताची वही गायब झाल्याची तक्रार यापूर्वी जीसीएचे सदस्य डॉ. शेखर साळकर यांनी केली होती.