मुंबई : बीडीडी चाळीतील पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असून रहिवाशांचे मोठ्या घरात राहण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. पुनर्विकासात तेथील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर दिले जाईल, असे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधानसभेत सांगितले.मुंबईतील आमदारांनी या संदर्भात नियम २९३ अन्वये प्रस्ताव मांडला होता. त्यावर उत्तर देताना वायकर म्हणाले की, या चाळींच्या पुनर्विकासाच्या कामाचे भूमिपूजन दोन आठवड्यांत करण्यात येणार आहे. वरळी, ना. म. जोशी मार्ग व नायगाव येथील राज्य शासनाची जागा व शिवडी येथे मुंबई बंदर न्यासाच्या जागेवर असे ९२.७० एकर जागेवर २०८ चाळी आहेत. १६,२०३ गाळे आहेत. पुनर्विकासाचे काम म्हाडामार्फत केले जाईल. ना.म. जोशी मार्ग येथील चाळीच्या पुनर्विकासासाठी शापुरजी पालनजी व नायगावच्या चाळीच्या पुनर्विकासासाठी लार्सन अॅण्ड टुब्रो या कंपन्यांची कंत्राटदार म्हणून निवड झाली. वरळी येथील चाळींचा पुनर्विकास हा निविदा स्तरावर आहे. प्रकल्पातून १३,६०० अतिरिक्त विक्रीयोग्य सदनिका निर्माण होणार आहेत. २००० पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याचे शासनाचे धोरण असल्याने रेल्वेच्या हद्दीतील झोपड्यांसंदर्भात रेल्वे अधिकारी, एसआरए तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)सेस इमारतींचा पुनर्विकास करताना अनेक वेळा विकासकाकडून अपूर्ण कामे करण्यात येतात. त्यामुळे यापुढे अशा इमारतींचा विकास करताना मालक, विकासक तसेच म्हाडा यांच्यात एक संयुक्त करार करण्यात येणार आहे. त्यासाठी मॉडेल अॅग्रिमेंट ड्राफ्ट तयार करण्यात येत असून त्याबाबत विधी सल्लागार समितीचा सल्ला घेऊनच याप्रश्नी एका महिन्यात सरकारकडून योग्य ती पावले उचलण्यात येणार आहेत.
बीडीडी चाळ पुनर्विकासाचे भूमिपूजन दोन आठवड्यांत
By admin | Published: April 02, 2017 1:42 AM