- गौरीशंकर घाळे, मुंबई
बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. ९५ वर्षे जुन्या असलेल्या या चाळींच्या पुनर्विकासाचे भिजत घोंगडे फडणवीस सरकारच्या काळात मार्गी लागले. या कामाचे श्रेय घेण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी चालविली आहे. बीडीडी चाळीत सर्वत्र झेंडे, पोस्टर, बॅनर आणि पत्रकांच्या माध्यमातून भाजपाची हवा तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. डिलाईल रोड, नायगाव, वरळी आणि शिवडी या परिसरात तब्बल २०७ बीडीडी चाळी आहेत. अवघ्या १६० चौरस फुटांच्या खोल्यांमध्ये १६ हजारांहून अधिक कुटुंबे वास्तव्यास आहेत. वर्षानुवर्षे मागणी, बैठका, निवदने आणि आंदोलनानंतरही ब्रिटिशांच्या काळात उभारलेल्या आणि जीर्ण झालेल्या या चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागला नाही. फडणवीस सरकारने अडीच वर्षांत जलदगतीने पावले उचलत प्रकल्पाची सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात डिलाईल रोड आणि नायगाव येथील चाळींचा पुनर्विकास केला जाणार असून, त्यासाठी कंत्राटदारांची नियुक्तीदेखील करण्यात आली. डिलाईल रोड येथील चाळींचे काम शापूरजी अँड पालोनजी तर नायगाव येथील चाळींचा पुनर्विकास एल अँड टी या कंपनीमार्फत केला जाणार आहे. वरळी येथील प्रकल्पाची निविदा काढण्यात आली असून, लवकरच कंत्राटदाराच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे सध्या १६० चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या चाळकऱ्यांना पुनर्विकासानंतर ५०० चौरस फुटांचे घर मोफत मिळणार आहे. बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी पुनर्विकासाचा प्रश्न जिव्हाळ्याचा असल्याने भाजपाने श्रेयासाठी सारी शक्ती पणाला लावली आहे. वरळीच्या जांबोरी मैदानात भव्य सभेच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे. तर मैदानाबाहेर राजकीय पक्षांची जोरदार पोस्टरबाजी सुरू आहे. वरळीतील पोस्टर आणि पक्षाचे झेंडे पाहिल्यास भूमिपूजनाचा सोहळा भाजपाने चक्क हायजॅक केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. भाजपाच्या या आक्रमक श्रेयमोहिमेमुळे शिवसेना आणि काँग्रेसची मात्र पूर्ण कोंडी झाली आहे. नायगाव भागात काँग्रेसचे कालिदास कोळंबकर आमदार असून, वरळीत शिवसेनेचे सुनील शिंदे आमदार आहेत. तर, नगरसेवकांमध्ये शिवसेना आघाडीवर आहे. इतकी वर्षे पाठपुरावा करूनही ऐनवेळी सारे श्रेय भाजपाच्या वाट्याला जाणार अशी चिन्हे आहेत. शिवसेनेने स्थानिक पातळीवर पुनर्विकास प्रकल्पासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती देण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र, भाजपाच्या भव्य सोहळ्यासमोर तो तोकडा आहे. नायगावातील काँग्रेसची स्थिती अगदीच केविलवाणी झाली आहे. काँग्रेसचे कालिदास कोळंबकर भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. कोळंबकरांचे तळ्यातमळ्यात सुरू असल्याने काँग्रेसमध्ये गोंधळाची स्थिती आहे. त्यातच कोळंबकरांनी आपल्या पोस्टरवर थेट मुख्यमंत्री फडणवीस यांचेच छायाचित्र छापल्याने काँग्रेसमध्ये नाराजी आहे. कार्यक्रमाला अनेक नेत्यांची उपस्थितीबीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी स्वतंत्र सुधारित विकास नियंत्रण नियमावली तयार करण्यात आली आहे. नायगाव येथे ६.४५ हेक्टर परिसरात बीडीडीच्या ३२ चाळी असून, त्यात ३ हजार ३४४ कुटुंबे राहत आहेत. तर, ना.म. जोशी मार्गाजवळील ३२ चाळींमध्ये २ हजार ५६० कुटुंबे आहेत. या कार्यक्रमाला मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार अरविंद सावंत, खासदार राहुल शेवाळे, आमदार सुनील शिंदे, आमदार कालिदास कोळंबकर यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे म्हाडाने आपल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळी मात्र सबकुछ भाजपा असेच चित्र आहे. - सरकारने पुनर्विकासाबाबत स्थानिकांना विश्वासात घेतलेले नाही. या प्रकल्पासाठी स्थानिकांच्या संमतीची गरज नसल्याबाबतचा शासन निर्णय सरकारने काढला त्यामुळे सरकारच्या हेतूबाबत शंका निर्माण झाली आहे. - बीडीडी चाळी म्हणजे केवळ इमारती नाहीत. मोठ्या प्रमाणावर मैदाने, उद्यानेही या परिसरात आहेत. ती कायम राहणार का? बौद्धस्तूप, मशीद आणि मंदिरांचे काय करणार, याचे उत्तर सरकारने द्यायला हवे. - रहिवाशांच्या मनात अनेक शंका आहेत. मात्र स्थानिक आमदार मूग गिळून आहेत. उद्या आम्ही विविध संघटनांच्या माध्यमातून सरकारचा निषेध करणार आहोत, अशी माहिती काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी दिली.