ठाणे : भाजप शिवसेनेशी संघर्ष करण्यासाठी नव्हे तर तर देशविरोधी विचारांच्या विरोधात असल्याचे मत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी सी टी राव यांनी ठाण्यात रविवारी व्यक्त केले. शिवसेना स्वत:च्या तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून लांब गेली आहे का ? असा प्रतिप्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
ठाण्यातील टीप टॉप प्लाझा या हाटेलच्या सभागृहात आयोजित ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी ते रविवारी ठाण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) तसेच महाराष्ट्रातील शिवसेना भाजप संघर्ष आणि भाजप शिवसेना युती संदर्भात रंगलेल्या चर्चा याबाबत प्रसार माध्यमानी त्यांना छेडले असता, त्यांनी युती संदर्भात मात्र आपली प्रतिक्रीया नोंदविणे प्रकर्षाने टाळले.
भाजप शिवसेनेसोबत संघर्ष करण्यासाठी नाही, देश विरोधी विचारांच्या विरोधी आहे, शिवसेना देश विरोधी नाही. मात्र, शिवसेना(Shivsena) आपल्या विचारांच्या तसेच बाळासाहेबांच्या विचारांच्या खूप लांब गेली आहे का? याचा विचार करण्याची खरी आज गरज आहे, अशी बोचरी टीकाही त्यांनी शिवसेनेवर केली आहे. राणे केवळ मंत्री नाही तर ते भाजपचे नेतेही आहेत. त्यांच्या वक्तव्याला पार्टीचे समर्थन नाही, पण त्यांच्या सोबत आम्ही आहोत, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
भाजप देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेसोबत आहे. जनतेच्या सुख दु:खा सोबत आहे. अफगाणिस्तानारखी स्थिती महाराष्ट्रात होऊ नये, यासाठी जागरूक रहा, असा कार्यकर्त्यांना त्यांनी सल्लाही दिला.