राजू काळे/ भाईंदर - फटाक्यांमध्ये तांबे व कॅडमियमसारखी विषारी संयुगे असतात. जी हवेत धूळ स्वरूपात बराच काळ राहतात. त्यामुळे दिवाळीनंतर श्वसनाचे व अस्थमाच्या पेशंटमध्ये कमालीची वाढ होते. यावरून या सणानंतर सुमारे 30 ते 40 टक्के लोकांना श्वसनाचा विकार होत असल्याचे मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलच्या श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. संगीता चेकर यांनी सांगितले. दिवाळीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली एनसीआरमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली होती व त्यांनतर महाराष्ट्रातसुद्धा निवासी संकुलामध्ये फटाके विक्रीला न्यायालयाने बंदी घातली असली तरीही लक्ष्मी पूजनाच्या व पाडव्याच्या आतषबाजीनंतर मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यातील वायू प्रदूषणात मोठी भर पडली आहे. या महानगरांमधील हवेची गुणवत्ता अत्यंत वाईट पातळीपर्यंत घसरली आहे. दिल्लीमध्ये गेल्यावर्षी दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या धुराची एवढी गडद चादर पसरली की तेथील शाळांना सुटी देणे भाग झाले होते. ही आठवण आज मुंबई व लगतच्या उपनगरातील जनता विसरल्याचे दिसत होते. फटाके फोडल्यानंतर त्यातून सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रेस गॅसेस बाहेर पडतात. ज्याचा सर्वाधिक त्रास अस्थमा, श्वसनाचा आजार आजार असणाऱ्या रूग्णांना होतो. मुंबईत तर दिवाळीच्या दिवसांत ३० ते ४० टक्के नवे रूग्ण असे येतात की ज्यांना पूर्वी कधीही अस्थमा किंवा श्वसनचा त्रास नव्हता. या दिवसांत रूग्णांची संख्या तीनपट अधिक असते. लहान मुलांची फुफ्फुसे छोटी असल्यानं त्यांना फटाक्यांचा धुराचा अधिक त्रास होतो. याविषयी अधिक माहिती देताना डॉ. संगीता चेकर यांनी सांगितले कि, फटाक्यांमध्ये तांबे व कॅडमियमसारखी विषारी संयुगे असतात.
जी हवेत धूळ स्वरूपात बराच काळ राहतात. त्यामुळे दिवाळीनंतर श्वसनाचे व अस्थमाच्या पेशंटमध्ये कमालीची वाढ होते. मुंबई, नवी मुंबई व ठाणे या शहरांचा विचार करता काळाच्या ओघात चाळ संस्कृती नष्ट झाली आहे. उंचचउंच टॉवर संस्कृती उदयास आली असून या उंच इमारतींमध्ये राहणाऱ्यांना फटाक्यांच्या धुराचा अधिक त्रास होतो. कारण फटाक्यांमुळे हवेत सोडले जाणारे सल्फर नायट्रेट, मॅग्नेशियम, नायट्रोजन डायोक्साईड आदी घटक हवेमध्ये सहजासहजी मिसळत नसून त्याचा थर हा जमिनीपासून ५०० ते हजार फुटावर तरंगत राहतो.
त्यामुळे या टॉवरमध्ये राहणाऱ्या वृद्ध व्यक्ती तसेच लहान मुलांना श्वसनविकाराचा अधिक त्रास होतो. तसेच अस्थमाचा अटॅक, ब्रॉकायटिस, शिंका येणे,नाक गळणे, डोकेदुखी असे विकारही वाढीस लागतात. केंद्र सरकारच्या 'सफर' या वायू प्रदूषण मोजणाऱ्या संस्थेच्या या वर्षीच्या अहवालानुसार मुंबई, पुणे, नवी मुंबई या शहरांचे प्रदूषण कमालीचे वाढले असून प्रदूषित वायूंची तसेच 'पर्टिक्युलेट मॅटर' म्हणजेच घनरूप दूषित कणांची उपस्थिती धोक्याच्या पातळीवर दाखविली गेली आहे.
'सफर'च्या माहितीनुसार, मुंबईतील मालाड भागात शहरातील सर्वाधिक वायू प्रदूषण आहे. या उपनगरातील हवेचा दर्जा केवळ खालवलाच नसून घातक पातळीपर्यंत पोहोचला आहे. आधीच वायूप्रदूषण अधिक असलेल्या मुंबईत दिवाळीच्या दिवसांत अस्थमा रूग्णांना राहणं मुश्किल होते. त्यामुळं अशा रूग्णांना दिवाळीमध्ये मुंबई बाहेर राहण्याचा सल्ला डॉ संगीता यांनी दिला आहे.