पंकज रोडेकर, ठाणेदिवाळीत ग्राहकांना सकस आणि निर्भेळ (भेसळविरहित) पदार्थ मिळावेत, या उद्देशाने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यात कोकण विभागातून ३७३ नमुने घेऊन ७५ लाखांचे भेसळयुक्त पदार्थ जप्त केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातून सर्वाधिक ३०० नमुने घेतले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई करणारा कोकण विभाग बहुधा राज्यात पहिला ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.अन्न व औषध प्रशासनाचे कोकण विभागात ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे प्रामुख्याने चार जिल्हे येतात. दिवाळीच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासन विभागाने ग्राहकांना सकस आणि निर्भेळ पदार्थ मिळावे, यासाठी १ आॅक्टोबरपासून विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेत १ ते १९ आॅक्टोबरदरम्यान ३७३ भेसळयुक्त पदार्थांचे नमुने घेण्यात आले. त्यामध्ये ७५ लाखांचे भेसळयुक्त पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्यात ३०० नमुने, रायगड जिल्ह्यात ५०, रत्नागिरी- १५ आणि सिंधुदुर्गातून ८ नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.ही कारवाई करताना अन्न व औषध प्रशासनाने प्रथम उत्पादकांपासून सुरुवात केली. त्यानंतर वितरक आणि शेवटी दुकानात कारवाई करून तेथून भेसळयुक्त पदार्थांचे नमुने घेण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक नमुने उत्पादकांकडून जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भेसळीपासून सावधान !
By admin | Published: October 21, 2014 3:54 AM